बारामती: वीजचोरी दखलपात्र गुन्हा असतानाही, काही जण वीजचोरी करुन स्वत:चा जीव सुद्धा धोक्यात घालतात. अशा वीजचोरांवर कारवाई करण्यासाठी महावितरणच्याबारामती विभागाने ‘आकडे हटवा, कनेक्शन वाढवा’ मोहीम उघडली असून अवघ्या पंधरा दिवसांत बारामती व इंदापूर तालुक्यात १५९७ वीजचोरांवर धडक कारवाई केली आहे. यातील ३५६ जणांनी नवीन कनेक्शन घेतले असून, १७८ चोरांवर विद्युत कायद्यातील कलम १३५ नुसार कारवाई केली आहे.
बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील व कार्यकारी अभियंता गणेश लटपटे यांच्या उपस्थितीत ४ डिसेंबर रोजी भिगवण येथे वीज कर्मचाऱ्यांचा मेळावा घेऊन वीजचोरांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. यासाठी त्यांना पंधरा दिवसांत पंधराशे वीजचोरांवर कारवाई करुन त्यांना नवीन कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट दिले होते.इंदापूर तालुक्यात सर्वाधिक १२३१ आकडे काढण्यात आले. पैकी १३८ ठिकाणी जुनी थकबाकी होती. यातून ६ लाख ३२ हजार रुपयांची रक्कम वसूल झाली. तर ४१३ जणांना नवीन कनेक्शनसाठी कोटेशन देण्यात आले. त्यातील २९६ जणांना पैसे भरुन नवीन कनेक्शन घेतले. तर १५१ वीजचोरांवर नियमानुसार पोलीसांत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.
बारामती तालुक्यात ३६६ आकडे सापडले. त्यातील ७६ जणांना कोटेशन दिले. पैकी ६० नवीन कनेक्शन झाले. १७ ठिकाणी मिळून ९२ हजारांची जुनी थकबाकी वसूल झाली. तर २७ जणांवर फौजदारी कारवाई करण्याचे काम सुरु आहे. पोलीस कारवाई नंतर जवळपास ३२ लाख रुपये वसूल होतील.
या कारवाईसाठी उपकार्यकारी अभियंता बारामती ग्रा. धनंजय गावडे, इंदापूरचे रघुनाथ गोफणे, वालचंदनगरचे मोहन सूळ, सोमेश्वरचे सचिन म्हेत्रे यांचेसह त्यांचे शाखा अभियंते व जनमित्रांनी परिश्रम घेतले. महावितरणच्या या धडक कारवाईने वीजचोरांमध्ये खळबळ माजली आहे.
नवीन वीज कनेक्शनसाठी महावितरणला संपर्क करा- गणेश लटपटे
अधिकृत वीज कनेक्शनसाठी महावितरण तत्पर असून केवळ ओळखपत्र व जागेचा पुरावा अशा दोन कागदपत्रांवर नाममात्र रक्कम भरुन कनेक्शन देण्याच्या सूचना दिल्या आहेत. जागेचा पुरावा नसेल तर २०० रुपयांच्या शपथपत्रावर कनेक्शन दिले जाते. त्यासाठी नजीकच्या शाखा कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन बारामती विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश लटपटे यांनी केले आहे.