पुणे: रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलाला शोधण्यात पुणेपोलिसांना यश आले. रागाच्या भरात भारती विद्यापीठ परिसरातून पीडित मुलगा चार महिन्यांपूर्वी निघून गेला होता. हा मुलगा जबलपूर रेल्वे स्थानकावर पाण्याच्या बाटल्या विकत असल्याचे आढळून आले. स्वारगेट तपास पथकाचे सह प्रभारी पोलिस उपनिरीक्षक अशोक येवले यांना त्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, भारती विद्यापीठ ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील यांना कळवून स्वारगेट तपास पथकाची टीम जबलपूर गाठत स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुलाला ताब्यात घेतले.
अधिक माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलिस ठाणे हद्दीतील १४ वर्षांचा मुलगा वडिलांवर रागावून घरातून निघून गेला होता. गेले चार महिने त्याचा शोध घेतला जात होता. स्वारगेट तपास पथकाचे उपनिरीक्षक अशोक येवले व त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक राज्यात मुलाचा शोध घेतला. या मुलाचा फोटो अन्य राज्यातील पोलिसांना पाठवून शोधण्याचे आवाहन केले होते. त्यातूनच जबलपूर रेल्वे स्थानकावर तेथील पोलिसांना हा मुलगा आढळून आला. त्यांनी येवले यांना ही माहिती दिली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पाच लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.
ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त प्रवीण कुमार पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नंदिनी वग्यानी यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील, तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलिस अंमलदार फिरोज शेख आणि हर्षल शिंदे यांनी केली आहे.