पुणे : महापालिका सर्वोच्च व उच्च न्यायालयामध्ये लढवित असलेल्या खटल्यांमध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांची माहिती विधी विभागाकडे नसल्याचे उजेडात आले होते, त्यानंतर खडबडून जागे झालेल्या विधी विभागाने वेगवेगळया खटल्यांमध्ये विभागांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांची माहिती एकत्रित करण्यास सुरूवात केली आहे. पालिकेच्या विभागांनी प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर त्याची एक प्रत विधी विभागाला द्यावी असे पत्र विधी विभागाकडून सर्व विभागांना पाठविण्यात आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी विधी विभागाकडे पालिकेने सर्वोच्च व उच्च न्यायालयामध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांची मागणी केली होती. विधी विभागाने त्यानुसार प्रतिज्ञापत्रांचा शोध घेण्यास सुरूवात केली असता विधी विभागाकडे प्रतिज्ञापत्रच उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी सर्व विभागांना पत्र पाठवून त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रे तातडीने सादर करण्यास सांगितले. यातून विधी विभागाचा गहाळ कारभारावर प्रकाश पडला होता. यापार्श्वभुमीवर महापालिकेच्या विभागांनी उच्च न्यायालयात तसेच सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करताना विधी विभागाशी सखोल चर्चा करावी अशा सुचना विधी विभागाच्यावतीने सर्व विभागांना केल्या आहेत. महापालिकेच्या मुख्य सभेत अनेकदा विधी विभागाच्या कारभारावर जोरदार टिका झालेली आहे, मात्र तरीही त्यामध्ये सुधारणा झालेल्या नाहीत. रविंद्र थोरात यांची उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर त्यांच्याकडे पुन्हा मुख्य विधी अधिकारी पदाचा पदभार देण्यात आला आहे. आता तरी विधी विभागाच्या कारभारामध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा नगरसेवकांकडून व्यक्त केली जात आहे.(प्रतिनिधी)
प्रतिज्ञापत्राबाबत विधी विभागाला आली अखेर जाग
By admin | Published: June 09, 2015 5:51 AM