Ajit Pawar Pune ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांच्या यादीवर कॅबिनेट बैठकीत लवकरच शिक्कामोर्तब केलं जाण्याची शक्यता आहे. सत्ताधारी महायुतीत ६ जागा भाजपला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी ३ जागा मिळणार असल्याचे समजते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या तीन संभाव्य नावांची यादीही काही दिवसांपूर्वी चर्चेत आली होती. मात्र पक्षाने अद्याप कोणत्याही नावांवर शिक्कामोर्तब केलं नसून सदर यादी चुकीची असल्याचा खुलासा अजित पवार यांच्याकडून आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना करण्यात आला आहे.
अजित पवार यांनी म्हटलं की, "राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या आमदारांबाबत आम्ही अद्याप कोणत्याही नावांवर शिक्कामोर्तब केलेलं नाही. मात्र तुमच्याच माध्यमातून मला काही नावं वाचायला मिळाली. ही नावं वाचून आमचीही करमणूक झाली," असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, विधानपरिषदेच्या जागेसाठी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांचंही नाव चर्चेत आल्याने पक्षात धुसपूस निर्माण झाली होती. यावर अजित पवार म्हणाले की, "या नावांबाबतची चुकीची बातमी पसरवली गेली होती. त्यामुळे त्यावरून वाद होण्याचा प्रश्नच नाही आणि त्याबाबत चर्चाही करण्याचं काही कारण नाही."
कोणत्या तीन नेत्यांची नावे होती चर्चेत?
राज्यपाल नियुक्त १२ जागांचा तिढा बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे. महाविकास आघाडी सरकार असताना राज्यपालांनी या यादीच्या मंजुरीला विलंब केल्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले होते. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या आधी या जागांची नियुक्ती व्हावी, यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जात असल्याचं दिसत आहे. अजित पवारांच्या पक्षाकडून रुपाली चाकणकर, आनंद परांजपे आणि सिद्धार्थ कांबळे यांचं नाव समोर आलं होतं. मात्र आता अजित पवार यांनी याबाबतचे वृत्त फेटाळलं आहे.
रुपाली ठोंबरेंनी काय म्हटलं होतं?
"एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार आमचे नेते अजितदादा न्याय नक्की देतील असा विश्वास आहे. एकाच महिलेला किती पदे देणार? कालपासून बातमी वाचत आहे, बातमीची शहानिशा केली तर पक्षाने कोणतेही पत्र अधिकृत दिले नाही असे सांगितले. पक्षाला कळकळीची विनंती असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये इतरही महिला आहेत. त्या सक्षमतेने, दमदार कामाने मोठ्या आहेत. पक्षात कर्तुत्वान महिला खूप आहेत त्या सक्षम, काम करणाऱ्या महिलांचा विचार करावा आणि इतर महिलांना समान संधी द्यावी," अशी विनंती रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली होती.