पुणे : उन्हाळा वाढू लागताच लिंबाचे भाव झपाट्याने वाढत आहेत. गेल्या दोन आठवड्यांत साधारण दुप्पट भाव वाढले आहेत. लिंबाच्या प्रतिगोणीला ५०० ते १५०० रुपयांपर्यंत भाव वाढले होते; मात्र मागील दोन-तीन दिवसांपासून ढगाळ हवामानाचा फटका बसत आहे. तसेच सोलापूर, अहमदनगर या पट्ट्यात लिंबाच्या झाडांना पाणी कमी पडू लागल्याने त्याचा दरावर परिणाम होत आहे. बाजारात या लिंबांना भाव कमी मिळत आहे. त्यामुळे प्रतिगोणीत १५०० रुपयांवरून २०० रुपयांनी घट होत सध्या १३०० रुपये असा भाव मिळत आहे. तर किरकोळ बाजारात लिंबू प्रतिकिलो ९० ते ११० रुपयांपर्यंत विक्री होत आहे.
बाजार समितीत ९० रुपये किलो
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत लिंबाला प्रतिकिलोचे दर ९० ते ११० रुपये तर किरकोळ बाजारात दीडशे रुपयांनी विक्री केली जात आहे. तर किरकोळमध्ये प्रतिनग लिंबाला ५ ते ८ रुपयांनी विक्री केली जात आहे.
शेजारच्या जिल्ह्यातून आवक
पुण्याच्या बाजारात मोठ्या प्रमाणात शेजारील राशिन, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातून लिंबाची आवक होते; मात्र या ठिकाणी सध्या वाढत्या तापमानामुळे पाण्याची कमतरता भासत आहे. त्याचा परिणाम लिंबाच्या गुणवत्तेवर होत आहे. त्यामुळे काही प्रमाणात या लिंबांना भाव कमी मिळत आहे.
भाव आणखी वाढणार ?
मागील दोन-तीन आठवड्यात लिंबाच्या भावात मोठी वाढ झाली होती; मात्र गेल्या दोन दिवसांपासून प्रति गोणीमागे २०० रुपयांपर्यंत घट झाली आहे. दोन आठवड्यांपूर्वी लिंबाच्या प्रतिगोणीला ५०० ते ८०० रुपये भाव मिळत होता. त्यानंतर त्यात वाढ होऊन तो सध्या ५०० ते १५०० रुपयांपर्यंत वाढला होता; मात्र ढगाळ हवामानामुळे २०० रुपयांनी त्यात सध्या घट झाल्याने ५०० ते १३०० रुपयांपर्यंत भाव आहे; मात्र तापमान येत्या काही दिवसांत वाढल्यास त्याचा परिणाम दरावर होऊ शकतो.
- विलास जाधव, व्यापारी