पुणे : गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात समृद्ध जीवन मल्टीस्टेट को-आॅपरेटीव्ह सोसायटीचे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांच्या पत्नी लीना यांना डेक्कन पोलिसांनी अटक केली.लीना मोतेवार यांना गेल्याच आठवड्यात एका गुन्ह्यातून जामिनावर मुक्तता करीत मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला होता. मात्र डेक्कन पोलिसांनी त्यांना दुसºया गुन्ह्यात अटक केली असून त्यांना २ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश आर.एन. सरदेसाई यांनी दिला आहे. यापूर्वी समृद्ध जीवन इंडिया फुड्स लिमिटेडच्या गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी लीना यांना अटक करण्यात आली आहे. तर आता त्यांना समृद्ध जीवन मल्टीस्टेट को-आॅपरेटीव्ह सोसायटीच्या माध्यमातून फसवणूक झाल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात यापूर्वी महेंद्र वसंत गाडे (वय ५१, रा. सिंहगड रस्ता), सुनीता किरण थोरात (वय ३७, रा. हडपसर), अभिषेक महेश मोतेवार (वय २१, रा. धनकवडी), प्रल्हाद किशोर पारसवार (वय ३२, रा. धनकवडी) या चौघांना अटक केली आहे. दत्तवाडी भागात राहणाºया ५३ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. तर महेश मोतेवार यांच्यासह सुमारे २० जणांवर गुन्हा दाखल आहे. ३० जुलै २०१५ ते २० सप्टेंबर २०१६ या कालावधीत शिरोळे रस्त्यावरील समृद्ध जीवन मल्टिस्टेट को-आॅपरेटीव्ह सोसायटीच्यामुख्य कार्यालयात हा सर्व प्रकारघडला आहे.यामध्ये ४१ लाख ५३ हजार ६३ रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. पारसवार याने लीना मोतेवार यांच्या खात्यामध्ये १ कोटी ५१ लाख रुपये वळते केल्याचे तपासातून समोर आले आहे. या गुन्ह्यातून अपहार केलेली रक्कम कोणत्या व्यवसायात गुंतवली आहे का, स्वत:चे अथवा नातेवाइकांच्या नावावर मालमत्ता खरेदी केली आहे का,याच्या तपासासाठी तिला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक जिल्हा सरकारी वकील सुनील हांडे यांनी केली.
लीना मोतेवारांना दुसऱ्या गुन्ह्यात अटक, न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 7:13 AM