लोणी काळभोर : महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील दहा देवस्थानांस तीर्थक्षेत्राचा ‘ब’ वर्ग दर्जा जाहीर झाला असूून, त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक गणपतीमधील थेऊर येथील श्री क्षेत्र चिंतामणी देवस्थान, जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट व तीर्थक्षेत्र वडज (ता. जुन्नर) येथील श्रीकुलस्वामिनी खंडेराय देवस्थान या तीन देवस्थानांचा समावेश करण्यात आला आहे.अष्टविनायकापैकी एक असणाऱ्या तसेच भक्तांची चिंता दूर करणारा म्हणून प्रसिद्ध असलेल्या, श्रीक्षेत्र थेऊर गावच्या श्रीचिंतामणी गणपती देवस्थानास, महाराष्ट्र शासनाकडून तीर्थक्षेत्राचा वरिष्ठ ‘ब’ वर्ग दर्जा जाहीर करण्यात आला. या संदर्भातील प्रस्तावाची फाईल ३ महिन्यांपूर्वी मुंबईतील बांधकाम भवन येथे दाखल करण्यात आली होती. या पूर्वी चिंतामणी गणपती देवस्थानास तीर्थक्षेत्राचा ‘क’ वर्ग दर्जा प्राप्त होता. आता तो रद्द करून तीर्थक्षेत्राचा वरिष्ठ ‘ब’ वर्ग दर्जा देण्यात आला आहे. याबरोबरच जुन्नर तालुक्यातील लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट आणि तीर्थक्षेत्र वडज (ता. जुन्नर) येथील श्रीकुलस्वामिनी खंडेराय देवस्थानाचाही समावेश आहे.बांधकाम विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता व उपसचिव मनोज जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बांधकाम भवन, मुंबई येथे झालेल्या बैठकीमध्ये सदर प्रस्तावास मान्यता देण्यात आली. तीर्थक्षेत्राचा वरिष्ठ ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त असणाºया देवस्थानांना विकासकामे करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या, ग्रामविकास विभागाकडून मोठ्या प्रमाणात भरीव निधी दिला जातो.
लेण्याद्री, थेऊरला ‘ब’ तीर्थक्षेत्राचा दर्जा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 11:23 PM