पुणे- आतापर्यंत अनेकदा आपण बिबट्याच्या हल्ल्यात कुत्र्याचा बळी जात असल्याच्या घटना पाहिल्या आहेत. पण, पुण्यात याच्या एकदम उलट घटना घडली आहे. पुण्यातील आंबेगाव येथे हल्ला करण्यासाठी आलेल्या बिबट्याचा कुत्र्याने पाठलाग केला आणि त्याला आपल्या जबड्यात पकडले. शिकारी बनून आलेला बिबट्या स्वतः कुत्र्याची शिकार झाला. या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल होतोय.
हिंदीत म्हण आहे, 'अपनी गली मे कुत्ता भी शेर होता है.' याचा प्रत्यय पुण्यातील या घटनेवरुन येतो. एका पाळीव कुत्र्याने चक्क बिबट्याला मात देत त्याला पळवून लावले आहे. या सर्व घटनेचा व्हिडीओही मोबाईलमध्ये चित्रित झाला असून सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. आंबेगावच्या गणेश शेवाळे यांच्या घरातील पाळीव 'वाघ्याने' चक्क बिबट्याला स्वतःच्या जबड्यात धरले.
विशेष म्हणजे, मागील 15 दिवसांमध्ये दोनवेळा वाघ्याचा बिबट्यासोबत सामना झाला आणि दोन्हीवेळा त्याने बिबट्याला पळवून लावले आहे. हल्ला करण्यासाठी आलेल्या बिबट्याला वाघ्याने 25-30 सेकंद त्याच्या जबड्यात धरले. यादरम्यान जखमी बिबट्याने कशीबशी स्वतःची सुटका करुन घेतली आणि तेथून पळ काढला.
ग्रामस्थांची बिबट्याला पकडण्याची मागणी
घटनेचा व्हिडिओ बनवणाऱ्या गणेश शेवाळे यांनी सांगितले की, 'रविवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. दोघांमध्ये चांगलीच लढत झाली, पण आमच्या 'वाघ्या'(कुत्रा)ने बिबट्याला पळवून लावले.' गेल्या अनेक वर्षांपासून परिसरात बिबट्याची आणि इतर वन्य प्राण्यांची दहशत आहे. वनविभाग व ग्रामपंचायतीने पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. यावेळी ग्रामस्थांनी वनविभागाला बिबट्याला पकडण्याचे आवाहन केले.