दावडी -निमगाव परिसरात गेल्या वर्षापासून बिबट्याचा वावर होता. येथील शेतकऱ्यांच्या जनांवरावर, शेळ्या मेंढयावर बिबट्याचा हल्ला करून फस्त करीत होता. वनविभागाकडे पिंजरा लावण्याची अनेक वेळा मागणी करूनही वन विभाग याकडे दुर्लक्ष करित होते. बिबट्याचे हल्ले सुरुच होते. पाच दिवसांपूर्वी एक घोडी व दोन शेळ्या बिबट्याने फस्त केल्या होत्या. चार दिवसांपूर्वी ‘लोकमत’ या परिसरात पिंजरा लावावा, असे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत वन खात्याने दोन दिवसांपूर्वी दावडी निमगाव गावच्या शिवेवर निमगावचे उपसरपंच संतोष शिंदे याच्या शेतात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. सोमवारी (दि.१९) सकाळी शेतकऱ्यांनी बिबट्या अडकल्याचे पाहून वनविभागाला फोन केला. वनअधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यात तो अडकल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला माणिकडोह परिसरात सोडण्यात आले, अशी माहिती वनरक्षक सुषमा चौधरी यांनी दिली. दोन वर्षे वयाचा नर जातीचा हा बिबट्या असल्याचे चौधरी यांनी सांगितले. बिबट्याला जेरबंद केल्यामुळे दावडीचे सरपंच संभाजी घारे, उपसरपंच राहुल कदम निमगावचे उपसरपंच संतोष शिंदे, पोलीस पाटील बाळासाहेब शिंदे, आत्माराम डुंबरे, ग्रामपंचायत सदस्य संतोष सातपुते, हिरामण खेसे, राणी डुंबरे यांच्यासह शेतकऱ्यांनी व आनंद व्यक्त केला.
१९ दावडी
दावडी या परिसरात पिंजऱ्यात जेरबंद झालेला बिबट्या.