मंचर (पुणे) :आंबेगाव तालुक्यात बिबट्याचा उपद्रव सुरूच आहे. लौकी येथे काल रात्री तब्बल पाच ठिकाणी बिबट्याने हल्ला केला असून, त्यात एक वासरू ठार झाले. तर पाळीव कुत्रे, दोन शेळ्या व एक मेंढी जखमी झाली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार लौकी येथे बिबट्याने एकाच रात्री पाच ठिकाणी हल्ला केला आहे. गावठाणात समाधान सुरुसे यांचे घर आहे. घराजवळच गोठा असून संपूर्ण बंदिस्त आहे. सर्वप्रथम बिबट्याने सुरुसे यांच्या गोठ्यातील वासरू ठार मारून ओढत नेले आहे. त्यानंतर शामराव थोरात यांच्या घरासमोर बसलेल्या पाळीव कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला केला. नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने तेथून धूम ठोकली. जवळ असलेल्या सुभाष मारुती थोरात यांच्या गोठ्यातील वासरावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे. तसेच मेढपाळ तान्हाजी सूळ यांच्या शेळी व मेंढीलाही बिबट्याने जखमी केले आहे. दरेकरवस्ती येथे हरिभाऊ लक्ष्मण वाघ यांनी शेळी घरात बांधली होती. भिंतीला असलेल्या छोट्याशा जागेतून बिबट्याने घरात प्रवेश करून शेळीच्या मानेवर हल्ला करून तिला जखमी केले आहे.
काळेमळा येथे कैलास थोरात यांना कुत्रे जोरात भुंकत असल्याने जाग आली. त्यावेळी त्यांना बिबट्या शेळ्यांवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ घरातील इतर नागरिकांना जागे करून आरडाओरडा करून प्रतिकार केला. त्यामुळे शेळ्यावरील बिबट्याचा हल्ला परतवून लावण्यात त्यांना यश आले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. एकाच रात्री पाच ठिकाणी बिबट्याने हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या भागात दिवसही घराबाहेर पडणे धोकादायक बनले आहे.