बारामती : कन्हेरी येथे बिबट्याने गुरुवारी(दि २३) सकाळीच एका शेतकऱ्याच्या गोठ्यात शिरुन शेळी आणि बोकडावर हल्ला केला.या हल्ल्यात बोकडाचा मृत्यु झाला,तर शेळी जखमी झाली. मंगळवारी(दि. २२) वगळता सलग पाचदिवस बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरुच आहे.लागोपाठ होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरातील शेतकरी दहशतीच्या वातावरणात आहेत.
भरदिवसा शेतकरी गुरुवारी सकाळी साडे सातच्या सुमारास कन्हेरी येथील शेतकरी दिलीप दत्तु काळे यांच्या घरालगत असणाऱ्या गोठ्याच्या भिंतीवर उडी मारुन बिबट्या शिरला.यावेळी बिबट्याने गोठ्यातील प्रथम बोकडाच्या नरडीचा घोट घेतला.त्यानंतर शेळीवर हल्ला केला. यावेळी शेळी जीवाच्या आकांताने ओरडली.शेळीचा आवाज ऐकुन दिलीप काळे यांचे बंधु नानासाहेब काळे धावत आले. यावेळी त्यांनी धाडसाने बिबट्याला हुसकावुन लावले.यावेळी जबड्यातील शेळीला सोडुन बिबट्या आलेल्या मार्गाने उडी मारुन निघुन गेल्याचे त्यांनी पाहिले.या हल्ल्यात शेळी जखमी झाली आहे. गेल्या सात दिवसांपासुन बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरुच आहे. एका कुत्र्यासह मेंढीआणि शेळीची शिकार आजपर्यंत बिबट्याने केली आहे.तर दोन शेळ्यांना शेतकऱ्यांच्या धाडसामुळे जीवदान मिळाले आहे. शुक्रवारी (दि १७)बिबट्याने येथील एका कुत्र्याची शिकार करुन फडशा पाडला. त्यानंतर लागोपाठ सोमवारी (दि २०) याच परीसरात मेंढ्याच्या कळपावर बिबट्याने हल्ला करुन मेंढीची शिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मेंढपाळ महादेव काळे आणि आनंदा केसकर या दोघा मेंढपाळांनी त्याच्यावर काठीने हल्ला केल्याने मेंढी सोडुन बिबट्याने पळ काढला होता. त्यानंतर येथील शेतकरी दत्तात्रय मारूती देवकाते यांच्या शेळीच्या कळपावर मंगळवारी (दि २१) दुपारी ३ च्या सुमारास बिबटयाने हल्ला केला.यावेळी बिबट्याने शेळीची मान जबड्यात धरुन शेळीला फरपटत नेले. देवकाते यांनी बिबट्याच्या जबड्यातुन शेळी वाचवण्यासाठी प्रयत्न केला.मात्र तो निष्फळ ठरला.वनविभागाने परीसरात पाहणी केल्यानंतर बिबट्याबरोबरच लहान पिलांचे ठसेदेखील आढळुन आले आहेत.त्यामुळे या परीसरात धुमाकुळ घालणारा बिबट्या मादीअसुन त्याच्याबरोबर त्याची पिल्ले असल्याचे स्पष्ट झाले आहे.————————————————...माणसाचा जीव गेल्यावर काय करणाऱ्या हल्ल्याबाबत शेतकरी रामचंद्र काळे यांनी लोकमत शी बोलताना सांगितले की,या बिबट्याने शेतकऱ्यांचे जगणे अवघड झाले आहे.रात्री अपरात्री शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रानात जावे लागते.वीजपुरवठ्याची वेळ निश्चित नसल्याने शेतकऱ्यांना जीव मुठीत धरुन शेतात पाणी देण्यासाठी जावेच लागते.लवकरात लवकर बिबट्याच्या वावरावर अंकुश निर्माण करण्यासाठी वन विभागाने कार्यवाही करावी