राजुरी (पुणे) : जुन्नर तालुक्यातील राजुरी उंचखडक परिसरात गेली काही वर्षे बिबट्या सतत धुमाकूळ घालत आहे. याठिकाणी प्रत्येक विभागात बिबट्याचा संचार आहे. बिबट्याची खूप मोठी दहशत या भागात पसरली असून, दिवसाढवळ्या बिबट्या पाळीव प्राण्यांवर प्राणघातक हल्ले करत आहे. येथील पानसरे मळ्यातील रहिवासी अब्बास अली सौदागर यांच्या गोठ्यातील पाच महिने वयाची संकरित गायीची कालवड बिबट्याने ठार केली.
यामध्ये सौदागर यांचे दहा हजार रुपयांपर्यंत नुकसान झाले असून, वन विभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करून सामान्य नागरिकांना बिबट्याच्या हल्ल्यापासून सुरक्षेची हमी द्यावी. तसेच नुकसान झालेल्या गरीब कुटुंबाला त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
आत्तापर्यंत रात्री बिबट्याने मुक्या जनावरांवर हल्ला केल्याच्या खूप घटना घडल्या आहेत. मात्र, भरदुपारी बिबट्या हल्ले करत आहे. याठिकाणीच तीन ते चार बिबट्यांना पाहिल्याचे सांगण्यात येते. पाळीव श्वान दिसतात तसेच आता बिबटेही या भागात दिसायला लागले आहेत. या घटनेमुळे सगळीकडेच भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.