राजगुरुनगर : नऊ वर्षाच्या मुलांवर बिबट्याने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. ही घटना रेटवडी (ता खेड ) येथे शुक्रवारी (१५ एप्रिल) संध्याकाळी घडली. सार्थक नवनाथ वाबळे असे मुलाचे नाव असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या पंधरा दिवसातील परिसरातील ही दुसरी घटना असून रेटवडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
रेटवडी येथील वाबळेवस्ती येथे सार्थक व वडील नवनाथ वाबळे हे बापलेक संध्याकाळी सव्वासात वाजता गुरांच्या गोठयाकडून घरी जात होते. सार्थकने घरी पाळलेले लहाण कुत्र्याचे पिल्लू उचलून घेतले होते. झाडाझुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने लहान कुत्र्यावर व सार्थकवर झेप घेऊन हल्ल्या केला. या हल्ल्यात सार्थकच्या हाताच्या दंडाला व पोटाला मोठ्या जखमा झाल्या आहेत. सार्थक व त्याच्या वडिलाने आराडाओरडा केल्यामुळे सार्थकने कडेवर उचलून घेतलेले कुत्र्याच्या पिलू तोंडात पकडून बिबट्याने धुम ठोकली.
घटनास्थळी तत्काळ वनविभागाचे कर्मचारी सुषमा चौधरी, दत्तात्रय फाफाळे यांनी धाव घेऊन जखमी अवस्थेत सार्थकला पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी याच परिसरात बिबट्याने साडेतीन वर्षाच्या मुलावर प्राणघातक हल्ला केला होता. या परिसरात बिबट्याचा वावर आहे. वाबळेवस्तीलगत हाकेच्या अंतरावर सतारकावस्ती येथे जिल्हा परिषेदेची प्राथमिक शाळा आहे. सध्या शाळा सकाळाच्या सत्रात सुरू असून लहान मुले शाळेत येत असतात. बिबटयाच्या भितीने शाळेत मुलांना पाठविण्यास धजवत नाही. वनविभागाने या परिसरात दोन पिंजरे लावले आहे. मात्र बिबट्या पिंजऱ्याकडे फिरकत नसल्याचे दिसून येत आहे. वाबळेवस्ती येथे हि पिंजरा लावावा अशी मागणी सुभाष हिंगे, अमोल वाबळे यांच्यासह ग्रामस्थ शेतकऱ्यांनी केली आहे.