ओतूर (पुणे) : परिसरात बिबट्यांच्या हल्ल्यात वाढ झाली असून, सोमवारी सायंकाळीही बिबट्याने एका दुचाकीवर हल्ला केला. यामध्ये दोन तरुण जखमी झाले आहे. पानसरे वस्ती-वाकचौरे मळा या दरम्यान ही घटना घडली.
अक्षय बाळासाहेब अहिनवे, तर आदित्य संदीप वाघचौरे हे काही कामानिमित्त दुचाकीवरून सोमवारी सायंकाळी पानसरेवस्ती ते वाकचौरेमळा जात होते. त्यावेळी बिबट्याने मागे बसलेले अक्षय अहिनवे या तरुणावर हल्ला केला, तर चालक आदित्य वाघचौरे हा किरकोळ जखमी झाला. दोघांनाही उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल केले आहे.
एकाच भागात आठवड्यात बिबट्याने तिसरा हल्ला केला आहे. यामुळे परिसरातील नागरिक दहशतीखाली आले आहेत. माळशेज पट्ट्यात बेसुमार वाढलेली बिबट्या संख्या व मानव-बिबट्या संघर्ष रोखण्यासाठी आंबेगव्हाण येथील प्रस्तावित बिबट्या सफारी कामाला जलदगतीने चालना देण्याची गरज आहे. परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.