टाकळी हाजी (पुणे) : म्हसे (ता. शिरूर) येथे बाजरी शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक महिलेवर हल्ला केला. मात्र दैव बलवत्तर म्हणून महिला वाचली. वनविभागाला वेळोवेळी मागणी करूनही पिंजरे लावले जात नसल्याने येथील ग्रामस्थ बिबट्यांच्या दहशतीखाली जगत आहे.
शनिवारी रात्री ८ वाजेच्या दरम्यान म्हसे येथे टाकळी हाजी रस्त्यावर राहत असलेल्या तुळसाबाई गंगाराम मुसळे या महिलेवर बाजरी शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. या महिलेने डोक्याला स्कार्प बांधलेला होता त्यामुळे डोक्याला पंजाची जखम झाली मात्र दैव बलवत्तर म्हणून ही महिला वाचली. या महिलेला तत्काळ शिरूरला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. घटना घडल्यानंतर घटनास्थळी तत्काळ घोडगंगाचे माजी संचालक राजेंद्र गावडे यांनी धाव घेतली तेथून वन अधिकारी जगताप यांना फोन करून बिबट्याच्या संरक्षणासाठी परिसरात पिंजरा लावण्यांची मागणी केली आहे. याबाबत येथील ग्रामस्थांनी सांगितले की रोज वस्तीवर बिबट्या दिसत असून आता पर्यंत चार-पाच शेळ्यां-बकरीचा फडशा पाडला आहे . मात्र संपूर्ण बकरी खाल्ल्याने त्यांचे अवषेश न सापडल्याने वनविभागाने पंचनामा करून नुकसानभरपाई दिली नसल्याचे चेअरमन सोनभाऊ मुसळे, रोहिदास मुसळे, बबन मुसळे, संदीप मुसळे यांनी सांगितले.
घोड व कुकडी नदीच्या काठावरील म्हसे गावासह डोंगरगण शिनगरवाडी, आमदाबाद, निमगाव दुडे, दुडेवाडी, तामखरवाडी, टेमकरवाडी, वडनेर सरदवाडी, माळवाडी, जांबूत, फाकटे, चांडोह, पिंपरखेड, कवठे येमाई, चांडोह परिसरात उसाचे क्षेत्र झपाट्याने वाढल्याने बिबट्यांना राहण्यासाठी सुरक्षित जागा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या वाढत चालली आहे. जांबुत पिंपरखेड येथे वेगवेगळ्या घटनांमधे बिबट्यामुळे चार लोकांना प्राण गमवावा लागला. मात्र त्यानंतरही या परिसरात ना शेतीसाठी वीज आली ना बिबट्यासाठी नवीन पिंजरे उपलब्ध झाले. त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या जिवाशी वनविभाग व राजकारणी नेते मंडळी तर खेळत नाहीत ना असा संतप्त सवाल केला जात आहे.
याबाबत राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष राजेंद्र गावडे म्हणाले की, या परिसरामध्ये बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, पशुदानाबरोबरच मनुष्य प्राण्यावर हल्ले वाढले आहेत. त्यामुळे वनविभागाने त्वरित यापरिसरातील गावांमध्ये पिंजरे लावण्यात यावे.