संदीप वाडेकरपुणे (खडकवासला) : पानशेत जवळच्या निगडे- ओसाडे गावातील मंदिरात झोपलेल्या पुजाऱी बिबट्याच्या हल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आज पहाटे चारचे सुमारास ही घटना घडली. बिबट्याच्या पंजाचे ठसे मिळाले असून वेल्हे वनपरिक्षेत्राचे अधिकारी आणि कर्मचारी बिबट्याचा मोसे पानशेत खोऱ्यातील जंगलात कसून शोध घेत आहेत. बिबट्याच्या वावराने परिसरात भितीचे सावट पसरले आहे.छबन महादेव जोरकर असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या आजोबांचे नाव आहे. आजोबांचे वय साधारण सदुसष्ट वर्षांचे असून जन्मापासून या गावात राहतात. आजोबा नेहमीप्रमाणे रात्री गावातील ओसाडाई देवीच्या मंदिरात ओसरीवर झोपण्यासाठी गेले. पहाटे चारच्या सुमारास मंदिरात कोणीतरी आल्याचा त्यांना भास झाला. ते उठेपर्यंत बिबट्या त्यांच्या जवळ आला होता. बिबट्याने आजोबांवर हल्ला करताच आजोबांनी पांघरून बिबट्याच्या अंगावर टाकून बचाव केला. तरीही पंजाने बिबट्याने त्यांना जखमी केले.जोरकर मोठ मोठ्याने ओरडू लागले. त्यांचा आवाज ऐकून त्यांचा मुलगा नाना व पत्नी बायडाबाई घरातून धावत ओसरीवर आल्या. त्यावेळी त्यांना जोरकर यांच्या अंथरूण शेजारी बिबट्या दिसला. बिबट्या गुरगुरत होता. त्याला पाहून नाना, बायडाबाई भयभीत झाले .मात्र प्रसंगावधानता दाखवत दोघे माय लेकरे मदतीसाठी आरडाओरडा करू लागले. त्यानंतर बिबट्या तेथून निघून गेला.जखमी अवस्थेत जोरकर यांना उपचारासाठी खडकवासला येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले . घटनास्थळी वनखात्याचे अधिकारी, कर्मचारी आले असतानाच दुसरीकडे सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शेजारील निगडे मोसे येथील शेतात बिबट्या शेतकऱ्यांना दिसला.
खडकवासला परिसरात मंदिरात झोपलेल्या पुजाऱ्यावर बिबट्याचा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 8:32 PM