अवसरी (पुणे) : आंबेगाव तालुक्यात दररोज शेतकऱ्यांच्या जनावरांवर बिबट्याचे हल्ले होतच आहेत. काल (२९ मार्च) कळंब येथे बिबट्याचा महिलेवर हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच आज पहाटे पारगाव येथे शेतात झोपलेल्या मेंढपाळावर बिबट्याने हल्ला केला आहे. या मेंढपाळाला वनरक्षकाने मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
पारगाव (ता. आंबेगाव) येथील पारगाव ते जवळी रस्त्यावर बाळू नाथा घुले (वय २८) रा. सध्या पारगाव. मुळगाव कुरुंद ता.पारनेर, जिल्हा अहमदनगर यांनी आपला शेळ्या मेंढ्यांचा वाडा कांदे काढलेल्या वावरात लावला होता. ते शेळ्या मेंढ्यांच्या शेजारीच झोपले होते. पहाटे ३ च्या सुमारास शेळ्या, मेंढ्यांच्या वासाने बिबट्याने तेथे शेळी, मेंढी झोपली असल्याचे जाणून शेळ्या, मेंढ्या ऐवजी घुले यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांच्या कानाला बिबट्याच्या पंजाचा जोरदार फटका बसला व घुले यांचा कान मागील बाजूस तुटला आहे.
या अचानक घडलेल्या घटनेने घुले गडबडून मोठमोठ्याने ओरडायला लागले व घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी बिबट्याचा हल्ला परतवायचा प्रयत्न केला. दरम्यान आजूबाजूचे नागरिक जमा झाले व बिबट्याला हुसकून लावण्यात यश आले.
या घटनेची माहिती मिळताच वन खात्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचून घुले यांना उपलिल्हा रुग्णालय मंचर येथे दाखल केले आहे. तिथे उपचार करून कानाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून तो मागील बाजूने तुटल्याने टाके टाकता येत नाही म्हणून घुले यांना पुणे येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.