पुणे :साकोरी येथे एका दुजाकीवर बिबटयाने अचानकपणे हल्ला केल्याची घटना काल रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. साकोरी (ता.जुन्नर) येथील सोमनाथ दगडू पानसरे (वय २७) या तरुणावर दुचाकीवरून जात असताना शनिवार (दि.११) रोजी रात्री साडेनऊ वाजता अचानक बिबट्याने हल्ला केला.
सविस्तर माहिती अशी की सोमनाथ पानसरे हे कामावरून रात्री साडेनऊ वाजता साकोरी-पानसरे रस्त्यावरून दुचाकीवरून घरी जात असताना शेजारी उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने पानसरे यावर हल्ला केला. सुदैवाने बिबट्याचा हल्ला फसला व केला या हल्ल्यात ते भयभीत झाले व दुचाकीवरून खाली पडले. बिबट्याने त्यांना कोणतीही दुखापत केली नसली तरी गाडीवरून पडल्याने पानसरे यांच्या डोक्याला व पायाला जबर मार लागला. त्यांना ताबडतोब निमगाव सावा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बेल्हे वनपाल दत्ता फापाळे यांनी घटनास्थळी ताबडतोब भेट देऊन सोमनाथ पानसरे यांची विचारपूस केली.
दरम्यान साकोरी या भागांमध्ये दिवसेंदिवस पाळीव प्राण्यांवर बिबट्यांचे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढतच चालले असुन आता पाळीव प्राण्यांबरोबर नागरिकांवर हल्ले होत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाला आहे. दिवसा बिबट्याचे दर्शन होत आल्याने या भागातले रहिवाशी आपला जीव मुठीत धरून राहत आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. सूर्यास्तानंतर घराबाहेर पडणे कठीण झाले आहे..या बिबटयांना पकडण्यासाठी वनविभागाने ठोस पावले उचलावित अशी मागणी होत आहे.