मंचर: चांडोली बुद्रुक( ता आंबेगाव) येथे तरुणावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला अखेर यश आले आहे. या बिबट्याची परिसरात प्रचंड दहशत पसरली होती. बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक येथील वेताळमळा परिसरात जयदीप रभाजी थोरात व ओंकार कैलास थोरात हे मोटार सायकलवरून जात असताना बिबट्याने रात्रीच्यावेळी त्यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी झाला होता. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या परिसरातील नागरिकांना दिवसाही या बिबट्याचे दर्शन होत होते. या परिसरातील शेतकऱ्यांचे पशुधन शेळ्या-मेंढ्या, कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर या बिबट्याने फडशा पाडला होता. शेतीच्या कामावर परिणाम झाला होता.
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी नागरिकांनी वनविभागाकडे मागणी केली होती. या मागणीनुसार सोमवारी शेतकरी जयसिंग थोरात यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला. बिबट्याला आमिष म्हणून पिंजऱ्यामध्ये सावज ठेवण्यात आले होते. आज सकाळी आठ वाजता हिरालाल काळे यांना बिबट्याच्या डरकाळीचा आवाज आला. त्यांनी पिंजऱ्याजवळ जाऊन पाहिले असता बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याचे दिसले. युवा सेनेचे जिल्हाधिकारी प्रवीण थोरात यांनी ही माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविली. ही माहिती मिळताच वनविभागाचे राजेंद्र गाढवे, कोंडीभाऊ डोके घटनास्थळी दाखल झाले.
या बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. रभाजी थोरात, रवींद्र थोरात, हिरालाल काळे आदी ग्रामस्थांनी पिंजरा हलवण्यासाठी मदत केली.या पिंजऱ्यात जेरबंद झालेला बिबट्या नर जातीचा आहे. तो तीन ते चार वर्षाचा असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. या बिबट्याला माणिकडोह येथील निवारा केंद्रात नेण्यात आले आहे.