पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत १०० जणांवर हल्ले झाल्याची नोंद वनविभागाकडे आहे. यात अनेक जण गंभीर जखमी तर काही किरकोळ जखमी झाले आहेत. महिन्याभराच्या काळात अनेक पशुधन बिबट्याने ठार मारल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यांच्या नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरू आहे, तर काहींना नुकसान भरपाई देण्यात आल्याची माहिती जुन्नर वनविभागाचे प्रमुख जयरामे गौडा यांनी दिली.
जिल्ह्यात खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर हे बिबट्याप्रवण क्षेत्र आहेत. या परिसरात असलेली ऊस शेती आणि अभयारण्य बिबट्याच्या वाढीस पोषक ठरले आहेत. शासनाने हा परिसर बिबट्याप्रवण क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बिबट्या आणि मानव संघर्ष या परिसरात पाहायला मिळत आहे. गेल्या दोन महिन्यांच्या काळात जिल्ह्यात १०० जणांवर बिबट्याने हल्ला केल्याच्या नोंदी आहेत. सुदैवाने या हल्ल्यात जीवित हानी झालेली नाही. मात्र, बिबट्याच्या हल्ल्यात पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. या परिसरात रोज शेतकऱ्यांचे पशुधन बिबट्याचे बळी ठरत आहेत. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी या ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत. तर बिबट्यांचा माग राखण्यासाठी त्यांच्या मानेवर सेंन्सरही लावण्याचे काम सुरू आहे. नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याचे काम सुरू आहे.