घोडेगाव : घोडेगावजवळ बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले आहेत. मादी बिबट्या व तिच्याबरोबर बछडे असून या बछड्यांमुळे ती माणसांवर हल्ले करीत असावी, तिला पकडण्यासाठी पिंजरे लावले असून लोकांनी रात्रीच्या वेळी सावध राहावे, असे आवाहन वनपाल बी. एम. साबळे यांनी केले आहे.
घोडेगाव शहर व परिसरात बिबट्याची दहशत पसरली असून दिवसाढवळ््या शेतांमध्ये बिबट्या दिसू लागला आहे. रविवारी (दि. ११) रात्री ८ च्या सुमारास घोडेगाव परांडा रोडवर दुचाकींवर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये विजय काळे व नारोडी गावचे पोलीसपाटील रामचंद्र नाईक जखमी झाले. यामध्ये दोघांच्या पायाला बिबट्याच्या नखाने जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. हा बिबट्या तत्काळ पकडण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. यासाठी वनविभागाने दोन पिंजरे लावले आहेत. रात्रीचे गस्तीपथक फिरत आहे. तसेच बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर लस देण्यासाठी वायसीएम रुग्णालयात न्यावे लागत होते, मात्र, याची व्यवस्था घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली असल्याची माहिती बी. एम. साबळे यांनी दिली.घोडेगाव परिसरात बिबट्यांच्या हल्ल्यात सातत्याने वाढ होत आहे. या परिसरात पिंजरा लावूनही बिबट्या जेरबंद होत नाही. येथील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांनी केले आहे.