देऊळगाव राजे (पुणे) : हिंगणीबेर्डीत गेली अनेक दिवस बिबट्याचा वावर दिसून येत आहे. रात्रीच्या वेळेस अनेक जणांना बिबट्या दिसून आला होता. आतापर्यंत मोकाट कुत्र्यांची शिकार करणारा बिबट्या आता पाळीव प्राण्यांवर हल्ला चढवत आहे. हिंगणीबेर्डी येथील मध्यरात्रीच्या सुमारास गोठ्यांवरील गाई-म्हशींच्या वासरांवरील हल्ल्यामध्ये एक वासरू जागीच ठार झाले असून, तीन वासरे गंभीर जखमी झाले आहेत.
माजी उपसरपंच प्रकाश ढवळे यांचा गावालगत जनावरांचा गोठा आहे. गोठ्यातील तीन लहान वासरांवर दि.११ रोजी रात्री १२ ते ३ च्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. त्यात गावरान गाईचे वासरू जागीच ठार झाले असून दोन म्हशींच्या रेड्या (पारडी) गंभीर जखमी झाल्या आहेत. तसेच शेजारील गोठ्यातील चंद्रकांत ढवळे यांच्या लहान वासरावर हल्ला झाला आहे.
पंधरा दिवसांपूर्वी मलठण येथे गाईची शिकार झाली होती. शेती काम करणाऱ्या शेतकरी व शेत मजुरांना दिवसा ढवळ्या बिबट वावरताना दिसत आहे. या भागात बिबट्याची संख्या किती आहे, हे अजून वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले नाही. परिसरातील नागरिक भयभीत झाले असून पिंजरा लाऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वारंवार होत आहे. परंतु वनविभागाकडून ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांना संपर्क केला असता नुकसान झालेल्या संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल, तसेच पिंजरा लावण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे मागणी केली आहे.