बेल्हा : येथील दत्तनगर शिवारात बुधवारी पहाटेच्या सुमारास मेंढपाळाचा एक घोडा बिबट्याने ओढत नेऊन फस्त केला.याबाबतची माहिती अशी : दत्तनगर शिवारात पाटीलबुबा हरी गाडगे यांच्या कपाशीच्या शेतात नानाभाऊ नारायण काळे (रा. वडगाव सावताळ, ता. पारनेर) ह्यांची बकरे (वाडा) बसविला होता. त्या वाड्याच्या बाहेरच त्यांनी घोडा बांधलेला होता. मंगळवारी (दि. २०) पहाटेच्या सुमारास जवळच्या उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने ३ वर्षे वयाच्या घोड्यावर हल्ला करून त्याला जवळच्या उसात १०० मीटर फरफटत ओढून नेले. सकाळी उठल्यावर नानाभाऊ काळे यांच्या लक्षात ही गोष्ट आल्यावर त्यांनी ग्रामस्थांना माहिती दिली. ग्रामस्थांनी ही माहिती वनखात्याला दिली. या ठिकाणी बिबट्याच्या पाउलखुणा दिसून आल्या आहेत. वनरक्षक व्ही. पी. लोंढे, वनकर्मचारी जे. पी. भंडलकर यांनी जाऊन घटनेचा पंचनामा केला. (वार्ताहर)निरगुडसर : आंबेगाव येथील वळसेमळ्यातील शेतकरी संतोष गणपत हिंगे यांच्या घराशेजारील गोठ्यात बांधलेल्या अवघ्या दोन महिन्यांच्या गाईच्या जर्सी कालवडीवर बुधवारी पहाटे बिबट्याने हल्ला करून तिला ठार केले. जवळच्याच उसाच्या शेतात नेऊन कालवडीला फ स्त केले़पहाटे साडेतीनच्या सुमारास जनावरांच्या हंबरण्याने वळसे यांना जाग आली़, तेव्हा त्यांना गोठ्यात कालवड आढळून आली नाही़ त्यांनी आजूबाजूला पाहिले; परंतु कालवड सापडली नाही़ तेव्हा त्यांना जवळील उसाच्या शेताच्या कडेने असलेल्या पाटातून बिबट्याने कालवड ओढताना झालेली फ रफट व बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले़शेतकरी वळसे यांचे आर्थिक नुकसान झाले असून, वन विभागाने नुकसानभरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे़ वनपाल मंगेश गाडे व वनरक्षक एस. आर. पाटील मॅडम, दशरथ मेंगडे यांनी पंचनामा केला असून भरवस्तीत बिबट्याने हल्ला केल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण झाले आहे़ या परिसरामध्ये वन विभागाने पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.(वार्ताहर)
जुन्नर, आंबेगावमध्ये बिबट्याचे हल्ले
By admin | Published: December 22, 2016 1:49 AM