लोकमत न्यूज नेटवर्क
ओतूर: शेतातील कामे संपवून दुचाकीवरून नातेवाईकांबरोबर घरी जाणाऱ्या एका तरुणीवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले. नशीब बलवत्तर म्हणून ही तरुणी बिबट्याच्या हल्ल्यातून बचावली. ही घटना शुक्रवारी (दिण४) रात्री ७.३० च्या सुमारास ओतूर ब्राह्मणमळा रस्त्यावर घडली. मनीषा विष्णू घोडे (वय १६) असे बिबट्याच्या हल्यात जखमी झालेल्या तरूणीचे नाव आहे.
शेतातील कामे संपवून रामदास विठ्ठल लोहकरे हे मनीषा विष्णू घोडे हिला दुचाकीवरून ओतूर हद्दीतील फापाळे शिवार, ब्राम्हणवाडामार्गे कॅनॉलजवळील आपल्या राहत्या घराकडे जात होते. यावेळी रस्त्यालगतच्या उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने दुचाकीवर थेट झेप घेऊन दुचाकीवर मागे बसलेल्या मनीषा घोडे या मुलीच्या पायावर पंजा मारून तिला जखमी केले. लोहकरे यांनी प्रसंगावधान राखून दुचाकीला वेगात पुढे नेल्यामुळे हे दोघेही बचावले. जखमी मुलीला शासकीय रुग्णवाहिकेने ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून प्राथमिक उपचार केले व पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. दरम्यान याच फापाळे शिवार परिसरात दोन दिवसांपूर्वी याच पद्धतीने बिबट्याने दुचाकीस्वारावर झेप घेऊन हल्ला करण्याचा प्रयत्न करत रोहकडी येथील रवींद्र अर्जुन घोलप यास जखमी केले आहे. तर खामुंडी येथील तळवळी शिवारात बिबट्याने गोठ्याचे लोखंडी तारेचे कुंपण तोडून दोन बकरे ठार केल्याची घटनाही ताजीच आहे.
वारंवार बिबट्याचे पाळीव प्राणी व मानवावरील हल्ले ही चिंताजनक बाब आहे. या भागात किती बिबटे आहेत, याची गणना होणे आवश्यक आहे. त्यानुसार उपाययोजना करणे गरजेचे आहे. वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यांमुळे येथील नागरिक दहशतीखाली आहेत. वनविभागाने या घटनांची दखल घेऊन पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
- बिबट्याच्या हल्ल्यात मनीषा घोडे हिच्या पायावर झालेली जखम.