लोकमत न्यूज नेटवर्क
ओतूर : येथील घुलेपट येथे सोमवारी सायंकाळी ६.३०च्या सुमारास उसात दडून बसलेल्या बिबट्याने शेतात काम करणाऱ्या युवकावर पाठीमागून हल्ला करत जखमी केले. त्याने आरडाओरड केल्याने, तसेच बिबट्याला प्रतिकार केल्यामुळे बिबट्या पळाला. जखमी युवकाला ओतूर प्राथमिक रुग्णालयात प्रथोमोपचार करून पिंपरी-चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नीलेश ज्ञानेश्वर घुले (वय ३३, रा. घुलेपट) असे जखमी युवकाचे नाव आहे. घुलेपटात नीलेश हा शेतात सोयाबिनची पेरणी करण्यासाठी ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणीपूर्व मशागत कशी झाली, हे पाहण्यासाठी आला होता. ट्रॅक्टरचालक निघून गेला होता. नीलेश घुले शेताच्या बांधावर मशागतीची पाहणी करीत असताना उसात दडून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर पाठीमागून येत हल्ला केला. नीलेशच्या दंडाला चावा घेत त्याला ोरखडले. नीलेशने आरडा आेरडा केला. तसेच बिबट्याला प्रतिकार केला. दरम्यान, नीलेशच्या आवाजाने आजूबाजूंच्या शेतातील लोक आले. त्यांची चाहूल लागताच बिबट्याने बाजूच्या शेतात धूम ठोकली. या घटनेत नीलेशला ३२ जखमा झाल्या आहेत. नागरिकांनी जखमी नीलेशला ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सारोक्ते व डॉ. यादव शेखरे यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेण्यास सांगितले. वनविभागाचे वनपाल सुधाकर गित्ते, वनपाल रवींद्र गवांदे, सुदाम राठोड, फुलचंद खंडागळे आरोग्य केंद्रात आले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी जुन्नर पंचायत समितीचे सभापती विशाल तांबे उपस्थित होते. त्यांनी नीलेशची विचारपूस केली. नीलेश यांच्या उपचारासाठी जो खर्च येईल तो खर्च वनविभागाच्या वतीने केला जाणार आहे, अशी माहिती वनपाल सुधाकर गिते यांनी सांगितले.
चौकट
पिंजरा लावण्याची मागणी
या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. यामुळे नागरिक दहशतीखाली असून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा. तसेच विद्युत दिवे लावावे अशी मागणी केली. ओतूर वनविभागाच्या वतीने तातडीने पिंजरा लावण्यात आला आहे.
जखमी नीलेशची प्रकृती सुधारत आहे
फोटो : बिबट्याच्या हल्यात जखमी झालेले नीलेश घुले