आळे (ता. जुन्नर) येथील पाडेकर वस्तीचे शिवारात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात दोन वर्षे वयाचा बिबट्या जेरबंद झाला असल्याचे आळे वनपरिमंडळ वनपाल संतोष साळुंखे यांनी सांगितले.
आळे बोरी रस्त्याचे बाजूला असलेल्या पाडेकरवस्ती येथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव प्राणी ठार झाले होते. त्यातच हा बिबट्या मानवीवस्तीजवळ येत होता. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. येथे तातडीने पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. दरम्यान, पाडेकर वस्तीवरील बिबट्याचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले व मानवी वस्तीजवळ संचार लक्षात घेत वनविभागाने दिलीप भीमाजी पाडेकर यांचे उसाच्या शेतालगत बिबट्यास जेरबंद करण्यासाठी तीन दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता. आज शुक्रवारी पहाटेपूर्वी या पिंजऱ्यात दोन वर्षे वयाचा नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला. सकाळीच वनपाल संतोष साळुंखे वनरक्षक सुवर्णा खुटेकर, वनमजूर सुरेश गायकर यांनी या बिबट्यास माणिकडोह येथील बिबट्या निवारण केंद्रात हलविले आहे.