दावडी परिसरात गेले सहा महिन्यांपासून बिबट्याच्या धुमाकूळ सुरू होता. गेल्याच महिन्यात एका बिबट्याला वन विभागाने जेरबंद केले होते. रविवारी (दि. १५) पहाटे चारच्या सुमारास हा बिबट्या पिंजऱ्यात अडकला. दावडी परिसरात होरे, डुंबरे, खेसे या ठिकणी बिबट्याने दहशत घातली होती. अनेक शेतकऱ्यांच्या जनावरांचा या बिबट्याने फडशा पाडला होता. वनविभागाने घारेवस्तीजवळ शेताच्या बांधावर ४ दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता. खाद्य म्हणून पिंजऱ्यात बकरी ठेवली होती. बिबट्या पिंजऱ्यात अडकल्यामुळे नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या नर जातीचा असून ५ ते ६ वर्षांचा आहे. माणिकडोह येथे बिबट्या निवारण केंद्र या ठिकाणी पिंजऱ्यात पकडलेल्या बिबट्याला नेण्यात आल्याचे वनरक्षक सुषमा चौधरी यांनी सांगितले.
............................................................
दावडी परिसरातील सातपुते व घारेवस्ती या परिसरात अजून तीन बिबट्यांचा वावर आहे. या परिसरातील शेतकऱ्यांना हे बिबटे दर्शन देत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या पशुधनावरही बिबट्यांचे हल्ले सुरूच आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागाने या परिसरात पुन्हा पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा.
- संभाजी घारे, सरपंच. दावडी (ता. खेड)