पुणे : एका प्लास्टिकच्या गोणीमुळे बिबट्याचा जीव गेल्याची घटना नारायणगाव परिसरात बुधवारी घडली आहे. पाण्याच्या शोधात बिबट्या फिरताना संरक्षक कठडे नसल्याने विहिरीत पडला आणि त्यात एक मोठी प्लास्टिकची गोणी (खताची) होती. जीव वाचविण्यासाठी बिबट्या पिशवीत गेला आणि त्यातच अडकला. त्या बिबटचा गुदमरून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले.
नारायणगाव परिसरातील धनगरवाडीतील एका संरक्षक कठडे नसलेल्या विहिरीत बिबट्या मादी पडली होती. विहिरीत पडल्यानंतर ती जीव वाचविण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा तिथे मोठी प्लास्टिकची गोणी दिसली. त्या पिशवीत ती बिबट मादी गेली. त्यानंतर कदाचित आतमध्ये तिला श्वास घेता आला नाही. श्वास घेण्याच्या प्रयत्नात पाण्यात पडून पिशवीत पाणी जाऊन तिचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. ग्रामस्थ रमेश शेळके यांनी विहिरीवर गेले तेव्हा त्यांना हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर वन विभागाला माहिती देण्यात आली. वन अधिकारी तिथे आले आणि त्यांंनी पिशवीसह बिबट मादीला विहिरीबाहेर काढले. त्यानंतर शवविच्छेदन अहवालात त्या बिबट मादीचा गुदमरून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याचे समजले. त्यामुळे पिशवीमुळे एका बिबट मादीचा जीव घेतल्याने लोकांमध्ये तीव्र संताप आहे.
----------------------------------------
विहिरींना संरक्षक कठडे बांधावेत
उन्हाळा असल्याने अनेक वन्यजीवांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. ग्रामीण भागातील अनेक विहिरींना संरक्षक कठडे नाहीत. परिणामी वन्यजीव त्यात पडून जखमी होतात किंवा त्यांचा जीवही जातो. म्हणून विहिरींना कठडे लावणे आवश्यक असून, वन विभागानेही पाणवठ्यांची सोय करायला हवी, अशी मागणी वन्यजीव प्रेमींकडून होत आहे.
-----------------
खताला वापरतात ती गोणी विहिरीत पडलेली होती. त्यात बिबट गेली असणार आणि त्यात गेल्यावर श्वास घेण्यासाठी झटापट करावी लागली असेल. त्यातच गोणीत पाणी शिरून बिबटला श्वास घेता आला नसेल. परिणामी तिचा गोणीतच मृत्यू झाला.
- मनीषा काळे, वनपाल, नारायणगाव
--------------------