पिंपरी पेंढार येथील नवलेवाडी शिवारातील शेतकरी पवार हे मंगळवारी ( दि १३) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास विहिरीजवळ गेले असता त्यांना विहिरीत बिबट्याचा बछडा पडला असल्याचे दिसून आले याबाबतची माहिती त्यांनी तत्काळ वनविभागाला दिली या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनखात्याचे अधिकारी कर्मचारी व रेस्क्यू टीमचे सदस्य यांनी या बिबट्याच्या बछड्यास विहिरीमधून सुखरुप बाहेर काढले. ही घटना ताजी असतानाच बुधवारी ( दि १४) सकाळी पुन्हा याच विहिरीत बिबट्याच्या मादीचा मृतदेह पाण्यावर तरंगत असताना आढळून आला. याबाबत वनखात्याला माहिती मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश घोडके, वनपाल एस. के. साळूंके, वनरक्षक व्ही. टी. विभुते, वनसेवक बी. के. खर्गे, वनखात्याचे कर्मचारी तसेच रेस्क्यू टीमचे बाबाजी खर्गे, दीपक माळी, आकाश माळी, वसंत जाधव यांनी या बिबट्याच्या मादीचा मृतदेह बाहेर काढला.बिबट्याची मादी आणि तिचा बछडा भक्षाच्या शोधात असताना ही मादी व तिचा बछडा दोन्हीही एकाचवेळी विहिरीत पडले असण्याची शक्यता वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
पिंपरी पेंढार येथे विहिरीत पडून बिबट्या मादीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 4:09 AM