मंचर (पुणे) : गोठ्यात बांधलेल्या जनावरांवर बिबट्याने हल्ला करून तीन शेळ्यांचा फडशा पडला आहे. ही घटना चांडोली बुद्रुक येथे शनिवारी (दि. १) घडली, अशी माहिती माजी उपसरपंच संदीप थोरात यांनी दिली.
आंबेगाव तालुक्यात बिबट्याचे हल्ले वाढू लागले आहेत. यापूर्वी बिबट्याने नागरिकांवर हल्ले करून त्यांना जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत. बिबट्याने पशुधनाचे मोठे नुकसान केले असून दररोज कुठे ना कुठे बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडत आहेत. चांडोली बुद्रुक येथील वेताळमळ्यात शेतकरी कैलास लक्ष्मण थोरात यांच्या घराजवळ जनावरांचा गोठा आहे.
पहाटेच्या सुमारास बिबट्याने या गोठ्यामध्ये प्रवेश केला. तीन शेळ्यांवर हल्ला करून त्यांचा फडशा पाडला. या घटनेची माहिती समजताच वनरक्षक प्रदीप आवटी व वनमजूर जालिंदर थोरात यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे वेताळवस्तीवर घबराटीचे वातावरण पसरले आहे.