लोकमत न्यूज नेटवर्कभीमाशंकर : पौर्णिमेच्या चंद्राचा लख्ख प्रकाश... उन्हाळ्यात हिवाळ्यासारखी थंडी... रातकिड्यांचा किर्रर्रर्र आवाज... जंगलाची दाट झाडी... त्यात सुरू असलेला पक्ष्यांचा किलबिलाट... पाल्यापाचोळ्यांवरसळसळ करत झाडींमधून पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावर येणारे प्राणी... त्यांची हालचाल लगबग पाहण्याचा आनंद अनेक निसर्गप्रेमींनी भीमाशंकरच्या जंगलात बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने झालेल्या प्राणीगणनेत घेतला. यावर्षी झालेल्या गणनेत वीरतळे, सांभरशिंग, आणि फणसांड्याची सोंड येथे बिबट्याच्या मादी व बछड्याच्या पायाचे ठसे आढळून आले. त्यामुळे येथे त्यांचे वास्तव्य वाढत असल्याचे दिसून येते़ जंगलात असलेल्या १९ पाणवठ्यांच्या ठिकाणी लाकूडफाटा व पालापाचोळ्यांनी बनविलेल्या मचाणावर बसून वन्यप्राण्यांची गणना व सर्वेक्षण करण्यात आले.यामध्ये अनेक हौशी निसर्गप्रेम सहभागी झाले होते. यावर्षीच्या गणनेत अनेकांना सांबर, भेकर, रानकोंबडे, उदमांजर, शेकरू दिसले़ कडक उन्हाळ्याच्या मे महिन्यात जंगलात पाणी मोजक्याच ठिकाणी शिल्लक असते व पौर्णिमेच्या रात्री असणाऱ्या उजेडामुळे प्राणीगणना करणे सोपे जोते, म्हणून दरवर्षी बुद्धपौर्णिमेला प्राणीगणना केली जाते. भीमाशंकर वन्यजीव विभागाने काही पाणवठ्यांच्या जागी लोखंडी टॉवर उभे केले आहेत. या ठिकाणी निसर्गप्रेमी व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बसून प्राण्यांचे निरीक्षण केले. एखादी रात्र जंगलात घालवून वन्यप्राणी पाहाण्याचा चित्तथरारक अनुभव प्राणीगणनेतून हौशी निसर्गप्रेमींना मिळाला. भीमाशंकर वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक शिवाजी फटांगरे, सहायक वनसंरक्षक कीर्ती जमदाडे-कोकाटे यांच्यासह वनकर्मचाऱ्यांनी जंगलातील १९ पाणवठ्यांच्या ठिकाणी निसर्गप्रेमी व वनकर्मचारी बसवून गणना केली. यामध्ये वांगीणदरा, घाटघर, चौरा, भट्टीचेरान, कुंभारखान, वेल्होळी, उघडी कळमजाई, कोथीरणे, वाजेवाडी, भाकादेवी, विरतळे, संगमतळे, साकेरी तलाव, कारवीचादरा, वनस्पती पॉर्इंट या पाणवठ्यांच्या ठिकाणी गणना करण्यात आली. सहभागी निसर्गप्रेमींना ओळखपत्र देण्यात आली होती. यासोबत घ्यावयाची काळजी आणि सूचना सहायक वनसंरक्षक कीर्ती जमदाडे-कोकाटे यांनी दिल्या होत्या. याचे पालन करत निसर्गपे्रमींनी प्राणीगणना केली.
भीमाशंकरमध्ये बिबट्याच्या पाऊलखुणा
By admin | Published: May 12, 2017 4:57 AM