कोरेगाव भीमा (पुणे) : कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील आनंद पार्क व आनंद नगरच्या मागील बाजूस असलेल्या शेतामध्ये लोकवस्तीनजीक गेल्या चार दिवसांपासून बिबट्या आढळल्याने मोठ्या ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोरेगाव भीमा येथील आनंद नगर व आनंद पार्क येथे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असून पुणे नगर हायवे जवळच काही अंतरावर बिबट्या आढळल्याने आश्चर्य व भीती व्यक्त करण्यात येत असून नागरिकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण आहे.
आनंद पार्क जवळच काही अंतरावर बिबट्या दिसल्याने कुत्र्यांच्या मोठ्या प्रमाणात भुंकण्याच्या आवाजाने काही नागरिकांनी टेरेसवरून बिबट्याला पाहिले व त्याचा व्हिडीओ बनवला असून बिबट्या लोकवस्ती जवळ दिसल्याने भीती व्यक्त करण्यात येत आहे.
येथे शाळेसाठी जाणारे विद्यार्थी, कामाला जाणारे कामगार व महिला भगिनी, स्थानिक नागरिक व रहिवासी यांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली असून कामावर, शाळेत व इतर कामासाठी बाहेर जाण्यासाठी नागरिकांना भीती वाटत असून बिबट्या येतो की काय? असा भीतीयुक्त प्रश्न नागरिकांना पडत आहे. यावेळी वन विभागाचे बी. एन. दहातोंडे यांनी तात्काळ आनंद पार्क व आनंद नगर परिसराची पाहणी करून उद्या याठिकाणी बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात येणार असल्याचे सांगितले.
कोरेगाव भीमा येथील आनंद पार्क जवळील लोकवस्तीच्या मागील शेतात बिबट्या आढळल्याने नागरिकांच्या जीविताच्या दृष्टीने काळजी घेत वनविभागाने तातडीने पिंजरा बसवावा अशी मागणी कोरेगाव भीमाचे माजी सरपंच विजय गव्हाणे यांनी केली आहे.
नागरिकांनी सावधानी बाळगा
कोरेगाव भीमा येथे लोकवस्ती नजीक बिबट्याचा वावर असल्याने नागरिकांनी सावधानी बाळगण्याचे आवाहन कोरेगाव भीमाचे सरपंच विक्रम गव्हाणे यांनी करताना बिबट्या दिसला अगर कुत्र्यांचा भुंकण्याचा जास्त आवाज झाला तर फटाके फोडण्याचे आवाहन त्यांनी केले.