लोकमत न्यूज नेटवर्क
बेल्हा: जुन्नर तालुक्याच्या पुर्व भागात बिबट्याच्या समस्येने पुन्हा डोके वर काढले आहे. वाढत्या पशुधनांवरील हल्यांमुळे नागरीक त्रस्त झाले आहे. दहशतीमुळे ग्रामस्त बाहेर पडण्यास धजावत नाही. यामुळे कायमस्वरूपी या समस्येचा तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
बिबट्यांना पिंजऱ्यात पकडण्यासाठी वन विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडुन रीतसर परवानगी घ्यावी लागत असल्याचे सांगण्यात येते. गेल्या दोन ते चार दिवसांत शेळी, कालवड बिबट्याच्या हल्यात मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यात शेतकऱ्यांच्या पशुधनाचे नुकसान झाले आहे. वनविभागाकडुन रितसर पंचनामे होत असले तरी त्यांना नुकसान भरपाई मिळण्यास उशीर होत आहे. या परिसरातील ऊस शेती हे बिबट्याचे हक्काचे निवासस्थान बनले आहे. या पुर्व भागात वर्षानुवर्ष बिबट्यांची समस्या असुनही वन विभागाकडून बिबट्यांच्या कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. वनखातेही हतबल झाले आहे. पाण्याची सहज उपलब्धता, प्रजोत्पादनासाठी असलेले वातावरण यामुळे या परिसरात बिबट्याच्या समस्येने पुन्हा उग्र रुप धारण केले आहे. या परिसरात अद्यापही ३ ते ४ बिबटे असल्याची शक्यता आहे. सध्या ऊस तोडणी सुरू आहे. या दरम्यान बिबट्या सोबतच बछडेही नागरिकांना दिसत आहेत. शेतकत्यांना रात्रीच्या वेळी शेतात पाणी जीव मुठीत धरून द्यावे लागत आहे.