चास येथील चिखलदरा,शेगरमळा,जांभळेमळा व तोडकरमळा येथे मागील काही दिवसांपासून तीन बिबट्यांचा वावर असल्याची माहिती शेतकरी सांगत आहेत. आज पहाटे शेगरमळा येथे कानिफ लहानू शेगर यांचे वासरू,विक्रम नाथा शेगर व संतोष सखाराम पोकळे यांची पाळीव कुत्रे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात कानिफ शेगर यांचे पाच ते सात हजार रुपयांचे नुकसान झाले असून, याच परिसरात आज सकाळी यशवंत शेगर हे आपल्या शेतातील उसाला पाणी देत असताना उसातून काहीतरी आवाज आल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता बिबट्याने डरकाळी फोडल्याने शेगर यांनी आरडाओरडा करून उसाच्या शेतातून थेट घर गाठले.
वनविभागाकडे वारंवार मागणी करून देखील वनविभाग काणाडोळा करत आहे. या परिसरात जागोजागी बिबट्यांचे पायाचे ठसे शेतकऱ्यांना दररोज पाहावयास मिळत आहे. त्याचबरोबर आता दिवसाही बिबट्याचे शेतकऱ्यांना दर्शन होऊ लागल्याने शेतात काम करायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. धामणी ग्रामस्थांप्रमाणे आता आम्हीसुद्धा रात्री शेतात झोपलो तरच वनखाते पिंजरा लावणार का, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहे.