मंचर (पुणे) : बेल्हे-जेजुरी या राज्य मार्गावर लोणी (ता. आंबेगाव) येथे लोणी-पाबळ शिवेवर एक दुचाकीचालक या रस्त्याने जोरात जात असताना त्याला अंदाजे सात ते आठ महिन्यांचा बिबट्या आडवा आला. त्यामुळे त्याची बिबट्याला धडक बसली. यामध्ये बिबट्या जखमी झाला. वन खात्याने तत्काळ माणिकडोह येथे उपचारासाठी घेत असतानाच उपचारापूर्वीच रस्त्यातच तो मरण पावला आहे.
बेल्हे-जेजुरी रस्त्यावर बिबट्याला धडक दिल्याने बिबट्या जखमी झाल्याचे वन कर्मचारी बाळासाहेब आदक यांना समजताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन त्वरित वनपाल सोनल भालेराव, वनरक्षक साईमाला गित्ते, शिरूर तालुक्यातील वनपाल जी.एम. पवार यांना कळविले. वनरक्षक साईमाला गीते त्वरित घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांनी आपल्या वरिष्ठांशी संपर्क केला. तोपर्यंत वनपाल जी. एम. पवार हे वनविभागाची गाडी घेऊन घटनास्थळी दाखल झाले व जखमी बिबट्याला माणिकडोह (ता. जुन्नर) येथील निवारा केंद्रात पुढील उपचारासाठी हालविण्यात नेत असतानाच उपचारापूर्वी सदर बिबट्याचे निधन झाले आहे अशी माहिती शिरूर वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी दिली.