अवसरी (पुणे) : गावडेवाडी (ता. आंबेगाव) पाचखिळेमळा येथे शुक्रवारी रात्री अकरा वाजता अशोक मच्छिंद्र वायाळ यांच्या चार चाकी वाहनाच्या लाइटच्या फोकसमध्ये पुलाच्या कठड्यावर पूर्ण वाढ झालेला बिबट्या दिसला. उजेडात बिबट्या दिसताच तो गाडीच्या उजेडात चार चाकी गाडीकडे येऊ लागल्याने अशोक वायाळ व त्याचे कुटुंब घाबरले. अशोक वायाळ यांनी गाडीच्या दरवाजाच्या काचा लावून घेतल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, चार चाकीऐवजी दोन चाकी गाडी असती तर बिबट्याने हल्ला चढविला असता व जीवितहानी झाली असती. त्यामुळे वनविभागाने गावडेवाडी या परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी सुदाम ज्ञानेश्वर टेमकर यांनी केली आहे. बिबट्याचा वावर रात्रीच्या वेळी वाढल्याने सरकारने कृषी पंपासाठी दिवसा वीज पुरवठा द्यावा, अशी मागणी अवसरी गावचे सरपंच सारिका हिंगे, ग्रामपंचायत सदस्य अनिल हिंगे पाटील यांनी केली आहे.
भीमाशंकर साखर कारखाना व विघ्नहर साखर कारखाना यांच्यावतीने तालुक्यात ऊसतोड चालू झाली आहे. त्यामुळे बिबट्यांचे लपण्याचे ठिकाण कमी झाल्याने बिबट्यांनी आपला वावर मानवी वस्तीकडे वळवला आहे. तीन ते चार दिवसांपूर्वी बिबट्याने दुचाकीवर जाणाऱ्यांवर हल्ला चढवल्याच्या दोन - तीन घटना घडल्या होत्या. यात तीन जण जखमी झाले होते. त्यामुळे बिबट असलेल्या ठिकाणी अवसरी, गावडेवाडी, टाव्हरेवाडी, निरगुडसर, पारगाव परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. अवसरी परिसरात तर दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असल्याने बिबट्याच्या भीतीने आई - वडील लहान मुलांना दुचाकीवरून गावात शाळेत सोडत आहेत. तसेच शेतीसाठी आठ दिवसातून तीन दिवस रात्रीचे वेळी वीज पुरवठा होत असल्याने बिबट्याच्या भीतीने शेती पिकांना रात्रीच्या वेळी पाणी देता येत नाही.