तळेघर (पुणे) : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये बिबट्याने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातल्याने या भागातील आदिवासी बांधव धास्तावले आहेत. वनविभागाने तत्काळ दखल घेत या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आदिवासी नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे.
तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील जांभोरी, चिखली व तळेघर या गावांच्या वाड्या वस्त्यांमध्ये गेली पाच- सहा दिवस बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आढळत आहे. शुक्रवारी शेतातून घरी जाणाऱ्या गोंविद तिटकारे या व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला; परंतु, सुदैवाने ते यात वाचले. तर बारकू दुलबा केंगले (लोहारवाडी) यांच्या शेळीवर संध्याकाळी पाच वाजता बिबट्याने हल्ला केला.
आदिवासी भागामध्ये आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात मागील आठवडाभरापासून बिबटे अनेक ठिकाणी वावर आढळत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यातच पाटण खोऱ्यातील कुशिरे, पाटण, पिंपरी, साकेरी, मेघोली, जांभोरी, कळंबई, चिखली, तळेघर, फळोदे, निगडाळे, राजपूर, म्हातारबाचीवाडी आदी गावांमध्ये बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आढळत आहे. त्यामुळे बिबट्याचा तातडीने वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी सर्व आदिवासी बांधव करीत आहेत. आदिवासी भागात नेमके किती बिबटे आहेत, याचा अंदाज अद्यापही येत नसल्याने लोकांमध्ये मोठी भीतीचे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने या होणाऱ्या हल्ल्यांची तत्काळ दखल घ्यावी, अन्यथा आदिवासी जनतेच्या वतीने मंचर भीमाशंकर रस्त्यावर दि. १८ फेब्रुवारी रोजी रास्ता रोको करण्यात येणार असल्याचे आदिवासी नेते विजय आढारी यांनी सांगितले.
गेल्या पाच- सहा दिवसांपासून बिबट्याचा वावर आढळून आल्याने या परिसरामध्ये तत्काळ गस्त वाढवणे, लोकांमध्ये जनजागृती करणे, ज्या ठिकाणी जास्त वावर आढळून येत आहे, त्या ठिकाणी कॅमेरे लावण्यात येणार आहेत.
- महेश गारगोटे, वनपरिक्षेत्र अधिकारी, घोडेगाव