सिंंहगड रस्ता : घेरा सिंंहगडच्या दऱ्याखोऱ्यांत महिनाभरापासून बिबट्याचा वावर वाढल्याने रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे. वन विभागाने वेळीच खबरदारी घेऊन योग्य उपाययोजना करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.वाड्यावस्त्यांमधील गावकऱ्यांना महिनाभरापासून बिबट्याचे दर्शन होत आहे. दोन महिन्यांत मोरदरी, कोंढणपूर, सांबरेवाडी व दुरुकदरा येथे कुत्र्यांवर हल्ला करून बिबट्याने शिकार केली आहे. तर, १५ दिवसांपूर्वी मोरदरी येथे एका गावकऱ्याचा बैलही बिबट्याने मारला. बुधवारी सायंकाळी सिंंहगडावर फिरायला आलेले राहुल बालवडकर यांनी आतकरवाडी बाजूच्या पाऊलवाटेपासून अगदी जवळच बिबट्या घुटमळताना पाहिला. त्यांच्यासोबत असलेले त्यांचे सहकारी मिलिंद जोशीराव, सुधीर पाटील, विठ्ठल वांजळे यांनाही त्यांनी सावध केले. त्यांनीही बिबट्या पाहिला. बालवडकर यांनी बिबट्याचे छायाचित्र काढले. सुमारे १५ ते २० मिनिटे बिबट्या त्याच जागेवर बसला होता. पर्यटकांचा थोडासा आवाज येताच बिबट्या हिरव्यागार झाडीतून पसार झाला.घेरा सिंंहगडचे उपसरपंच पांडुरंग सुपेकर म्हणाले, ‘‘पाणी व भक्ष्याच्या शोधात बिबटे मानवी वस्त्यांपर्यंत पोहोचत आहेत. बिबट्यांची संख्या एकापेक्षा अधिक असावी.’’
सिंहगड परिसरात बिबट्या
By admin | Published: August 28, 2015 4:38 AM