रांजणगाव सांडस (पुणे) : शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील इनामगाव, मांडवगण फराटा, तांदळी, नागरगाव, रांजणगाव सांडस, राक्षेवाडी, आलेगाव पागा, न्हावरे, उरळगाव, आंधळगाव, निमोणे, बाभूळसर बुद्रूक, गणेगाव दुमाला आदी गावांतील वाडी वस्त्यांवर बिबट्याची दहशत काही संपता संपेना. बिबट्याचा वाढत असलेला वावर नागरिकांच्या आणि पाळीव प्राण्याच्या जीवावर दिवसेंदिवस बेतत चालला आहे.
शिरूर, दौंड तालुक्याच्या पूर्व भागामध्ये भीमा नदीच्या काठी उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. या भागात बिबट्याचा वावर जास्त प्रमाणात पाहावयास मिळत आहे. या भागातील साखर कारखान्याने शेतकऱ्यांची ऊसतोडणी केल्यामुळे ऊस शेत मोकळे झाले आहे. त्यामुळे बिबट्या नागरिकांना पाहावयास मिळत आहे. बिबट्याला लपण्यासाठी उसाचे क्षेत्र कमी झाल्यामुळे बिबट्या एका गावातून दुसऱ्या गावात नागरिकांना सकाळ, दुपारी हमखास पाहावयास मिळत असतो. बिबट्याने आपले भक्ष्य शोधण्यासाठी शेतातील वस्तीकडे मोर्चा वळवला आहे.
मांडवगण फराटा येथील शेतकरी पोपट प्रकाश काशीद यांनी बिबट्याच्या भीतीने आपल्या जनावरांच्या गोठ्याला तारेचे कुंपण घातले आहे. परंतु दोन दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने तारेच्या खालील जमीन उकरून शेळी ओढून नेली होती. शेळी शेजारच्याच उसाच्या शेतात नेऊन तिचा फडशा पाडला आहे.
शेतकरी बिबट्याच्या भीतीने शेतात महिला मजूरवर्ग पुरुष कामगार कामासाठी जायला घाबरत आहेत. बिबट्याची दहशत कमी असताना महावितरण कंपनी शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी महिन्यातील दोन आठवडे शेतीसाठी वीज रात्रीची असते. त्यामुळे बिबट्याच्या भीतीपोटी शेतकरी रात्री शेतात जात नाहीत. भीमा नदीकाठी वनक्षेत्र जंगल कुरण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बिबट्याचे वास्तव्य या भागात वाढत चालले आहे. बिबट्याची पैदास शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात जास्त प्रमाणात झाल्यामुळे या भागात बिबट्यांची संख्या किती आहे. हे नागरिकांना सांगता येणे कठीण झाले आहे. कारण सायंकाळी बिबट्या उसाच्या शेतात दबा धरून बसलेला असतो. त्यामुळे नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.
शेळ्या, मेंढ्या भक्षस्थानी -
मेंढपाळ व्यावसायिक शेळ्या, मेंढ्या सायंकाळी घरी घेऊन जात असताना बिबट्या आपले भक्ष्य शोधून उसाच्या शेतात जाऊन फडशा पाडत आहे. त्यामुळे वनविभागाने गावागावात पिंजरे लावून बिबट्यास पकडून जुन्नरच्या माणिकडोह बिबट निवारण केंद्रात बिबट्याची रवानगी करावी, अन्यथा पुढील काळात भीमा नदीकाठी बिबट्याची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढ होऊन नागरी वस्तीसाठी धोक्याची घंटा आहे.
साखर कारखान्याचा ऊस गळीत हंगाम दिवाळीत सुरू होऊन ऊस तोडणी पूर्ण करून मार्चअखेर गळीत हंगाम पूर्ण झाल्याने भीमा नदीकाठचे उसाचे क्षेत्र कमी झाल्याने बिबट्याला निवारा ऊस क्षेत्र जागा नसल्याने बिबट्या सैरभैर झाले आहेत. वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे. तसेच शिरूर तालुका बिबट्यामुक्त करावा.
- प्रा. भाऊसाहेब भोसले, संचालक, घोडगंगा साखर कारखाना