टाकळी हाजी : पिंपरखेड येथे कुऱ्हाडेवस्तीवर शेतात लावलेल्या पिंजऱ्यात नरभक्षक बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. गेली चार दिवसांपूर्वी पूजा जाधव (रा. टाकेवाडी कळंब, ता. आंबेगाव) ही महिला तिच्या पती व दिराबरोबर दुचाकीवरून प्रवास करत असताना लघुशंकेसाठी थांबलेल्या तिघांपैकी महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेला होता. त्यामुळे बिबट्याच्या होणाऱ्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. नरभक्षक बिबट्या पकडण्याच्या दृष्टीने वनविभागाने त्या परिसरात सहा पिंजरे लावले होते. त्यापैकी एका पिंजऱ्यात बिबट्या अडकला. ही बिबट मादी असून, तिचे वय साधारणतः सहा ते सात वर्षे असल्याचे तालुका वन अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी सांगितले.
या परिसरात मागील काही दिवसांत बिबट्याने मोठा उच्छाद मांडला असून, पिंपरखेडलगत असणाऱ्या जांबूतमध्ये साधारणतः तीन महिन्यांपूर्वी पूजा नरवडे या १९ वर्षीय युवतीवर बिबट्याने हल्ला करून ठार केले होते. तसेच त्यापूर्वीदेखील दोघांचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेला होता.
हल्ल्यानंतर बिबट जेरबंद केला असले तरी त्याला वन विभाग सोडणार कुठे, हा प्रश्न आहे. यापूर्वीही पकडलेले बिबटे वन विभागाने दुसऱ्या भागात सोडल्याने ते पुन्हा गावात येत असल्याचा गंभीर आरोप सरपंच राजेंद्र दाभाडे यांनी केला आहे. बिबट्या नुसता जनतेसमोर पकडायचा तो माणिकडोहला नेऊन बिबट्या निवारण केंद्रात सोडतो, असे ग्रामस्थांना सांगायचे. मात्र, बिबट्या निवारण केंद्रात सोडला जातो का? हा प्रश्न सामान्य जनतेला पडत आहे. याबाबत वन अधिकारी मनोहर म्हसेकर म्हणाले की, हा बिबट्या सहा ते सात वर्षांचा असून, शक्यतो हल्ला करणारा बिबट्या हाच असण्याची शक्यता आहे. मात्र, हे सर्व तपासणी अहवालानंतरच कळेल. याला माणिकडोह बिबट्या निवारण केंद्रात ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. नरभक्षक बिबट्याच्या पायाचे ठसे तपासून त्याची ओळख पटवली जाते. तो असेल तर त्याला निवारण केंद्रात ठेवले जाते. मात्र, आम्ही त्या परिसरात कॅमेरा ट्रॅप लावले असल्याने त्यामध्ये आम्हाला फक्त एवढा एकच बिबट दिसला असल्याने हाच नरभक्षक असण्याची शक्यता आहे.
या परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्याची संख्या वाढली असून, मागणी येईल तेथे पिंजरे लावण्यात यावेत, अशी मागणी सरपंच राजेंद्र दाभाडे व सोसायटीचे चेअरमन किरण ढोमे यांनी केली आहे. शिरूर तालुक्यात वनपाल व वनरक्षकांची संख्या कमी आहे. तसेच पिंजरेही अठरापेक्षा जास्त नाहीत. शिरूर तालुक्याचे पूर्व - पश्चिम अंतर सुमारे शंभर किलोमीटर आहे आणि शिरूर तालुका मध्यभागी आहे. त्यामुळे कुठलीही घटना झाली तरी वनाधिकारी यांना घटनस्थळी पोहचण्यासाठी किमान दोन तास जातात. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांची संख्या केंद्र सरकारने वाढून द्यावी व बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावंडे यांनी सांगितले.