पुणे : अतिशय लहान असणारी तीन बिबटची बछडे एका गावात ऊसतोडणी करताना आढळून आली. त्यांना परत त्यांच्या आईच्या कुशीत ठेवण्यासाठी त्याच दिवशी प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. शक्यतो बिबट दुपारी बछड्यांना शोधत नाही, पण इथे मात्र चक्क दुपारी येऊन आईने आपल्या बछड्यांना सुखरूप नवीन सुरक्षित ठिकाणी नेले. ही घटना देलवडी गावातील एका शेतकऱ्याच्या शेतात बुधवारी (दि.५) घडली.
दौंड तालुक्यातील पिंपळगाव येथील देलवडी गावातील संदीप शेंडगे यांच्या ऊसाच्या शेतात ऊसतोडणी केली जात होती. तेव्हा बिबट्याची तीन बछडे सापडली. त्यांनी त्वरित वनविभागाशी संपर्क करुन घटनेची माहिती दिली. वनपरीक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अंकुश खरात व नानासाहेब चव्हाण यांच्यासोबत दौंड येथील ecoresq टीम घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी बछडे ताब्यात घेतली. बछडे खूप लहान असून, एक मादी व दोन नर बिबट होते. डोळेदेखील उघडले नसल्याने मादी बिबट जवळच असल्याचे लक्षात आले व सायंकाळी ५ वा. सापडलेल्या ठिकाणी पुन्हा बछडे ठेवली. त्यावर ट्रॅप कॅमेराद्वारे नजर ठेवली.
सायंकाळी ६ वा. मावळत्या प्रकाशात मादी बिबट पहिल्या बछड्याला सुखरुप घेऊन गेली. असेच एक एक करुन तिन्ही बछडे आपल्या आईच्या कुशील गेली. यावेळी resq टीमचे श्रेयस कांबळे, अनिकेत तुपे, डॉ. श्रीकांत देशमुख, प्रशांत कौलकर, विक्रांत बनकर, ऋषिकेश मोरे व वनकर्मचारी यांनी मोलाची मदत केली.
बछडे खूपच लहान होते. एवढी लहान पिल्ले आई शिवाय जगणे शक्य नसल्याने त्यांना त्यांच्या आई जवळ सोडणे फार महत्त्वाचे होते. याचे महत्व शेतकरी संदीप शेंडगे यांना सांगितल्यावर त्यांनी देखील सहकार्य केले आणि आईपासून दुरावलेले बछडे अखेर आईच्या कुशीत सुखरुप गेली.
- नचिकेत अवधानी (अध्यक्ष, इको दौंड )