अवसरी: मेंगडेवाडी ता. आंबेगाव येथील धुळेवस्ती येथे शिकारीच्या शोधात आलेला बिबट्या गोठ्यामध्ये काही काळ बंदिस्त झाला होता. त्यावेळी गोठ्यात दुचाकी बाहेर काढण्यासाठी आलेला शेतकरी थोडक्यात बचावला आहे.
मेंगडेवाडी येथील धुळेवस्ती येथे मंगेश दिगंबर सोळसे हे शेतकरी राहत असून सकाळी ते कामानिमित्त साडेसहा वाजता उठले होते. गोठ्यात लावलेली दुचाकी बाहेर काढण्यासाठी ते गेले असता त्यांना गोठ्यात बिबट्या दिसला. त्यावेळी ते दुचाकी जागेवर सोडून बाहेर पळत आले. येताना त्यांनी गोठ्यातील शेळीचे बारके करडू बाहेर आणले. मात्र शेळी दोरीने बांधली असल्याने ती त्यांना बाहेर आणता आली नाही. बिबट्याने गोठ्यातील शेळीवर हल्ला करत तिला जखमी केले आहे. सोळसे यांनी गोठ्याचे दार लावून बिबट्याला आतमध्ये कोंडून घेत वनविभागाला माहिती दिली. वनविभागाचे कर्मचारी, रेस्कु टीम यांनी त्या ठिकाणी पिंजरा लावला मात्र गोठ्याच्या दरवाजा हा मोठा असल्याने बिबट्या पळून गेला.