मंचर: अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाला आहे .ही घटना पुणे-नाशिक महामार्गावर कळंब गावच्या हद्दीत सहाणे मळ्यानजीक रात्री घडली. बिबट्याचे शवविच्छेदन करून पेठ -अवसरी वनउद्यानात त्याचे दहन करण्यात आले .
याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे, पुणे - नाशिक महामार्गावरील कळंब गावच्या हद्दीतील सहाणेमळ्यात एक वर्षीय बिबट मादीचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाला आहे. आंबेगाव तालुक्यातील कळंब, चास, साकोरे, लौकि, चांडोली या गावांमध्ये मागील आठ ते दहा वर्षांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर ला आहे. या परिसरात अनेक ठिकाणी बिबट्यांचे हल्ले झाले आहे .त्यात अनेक जनावरे ठार झालेली आहे .हे बिबट प्रवण क्षेत्र झाले असून या परिसरात नागरिकांना वारंवार बिबट्याचे दर्शनही होत असते. शनिवारी रात्री आठच्या सुमारास पुणे- नाशिक महामार्गावरील कळंब येथील सहाने मळ्याजवळ भरधाव वेगाने येणा?्या अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक दिली. या धडकेत बिबट्या जागीच ठार झाला आहे.
अरुण भालेराव यांना महामार्गावर हा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला . त्यांनी याबाबतची माहिती वनखात्याला दिली. वनपरिक्षेत्राधिकारी योगेश महाजन ,वनपाल बी. एम .साबळे नारायण आरुडे, कैलास दाभाडे,कल्पना पांढरे,बी.जी.भालेराव यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून मृत बिबट्याला ताब्यात घेतले .पेठ वनउद्यान येथे बिबट्याचे शवविच्छेदन डॉ. शरद निघोट यांनी केले आहे. सदर बिबट्या मादी जातीचा आहे. त्याचे वय अंदाजे एक वर्ष असून वाहनाच्या धडकेत पायाला व छातीला मार लागल्याने तो जागीच ठार झाला आहे. शवविच्छेदनानंतर पेठ- अवसरी घाटात त्याचे अग्निदहन करण्यात आले .