पुण्याच्या ग्रामीण भागात बिबट्यांचा वावर वाढलाय; हल्ले रोखण्यासाठी ३०० पिंजऱ्यांची खरेदी - अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2024 10:51 AM2024-12-12T10:51:10+5:302024-12-12T10:51:41+5:30
ग्रामीण भागात ज्या ठिकाणी बिबट्यांची संख्या अधिक त्याठिकाणी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून विशेष पथके तयार करण्याच्या विभागाला सूचना
वाघोली : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर वाढला आहे. बिबट्यांचे मानवावर हल्ले होण्याचे प्रमाणही वाढले आहे. या घटना घडू नये, यासाठी उपाययोजना करण्यासाठी ३०० पिंजरे खरेदी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा वन विभाग अधिकारी महादेव मोहिते यांना दिले असल्याची माहिती आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी दिली.
आमदार कटके यांनी मुंबई येथे शिरूर-हवेली मतदारसंघातील विविध मुद्द्यांबाबत उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतली. पिंजरे खरेदी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीद्वारे विशेष निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले. बिबट्या निवारा केंद्राची क्षमता वाढवून ती तीन महिन्यांत १०० बिबट्यांची करावी. महावितरणने शेतकऱ्यांना दिवसा थ्री-फेज विद्युतपुरवठा करावा, मानवी वस्तीतील बिबट्यांचा शिरकाव होऊ नये, याकरिता वनकर्मचाऱ्यांनी सतर्क राहावे, असे निर्देश ही त्यांनी वनाधिकाऱ्यांना दिले.
विशेष पथकांची नियुक्ती
शिरूर-हवेलीतील ज्या गाव परिसरात बिबट्यांची संख्या अधिक आहे. त्या ठिकाणी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून विशेष पथके तयार करण्याच्या सूचना वन विभागास देण्यात आल्या आहेत. तसेच, जिल्हा आपत्ती निवारण निधीतून मेंढपाळांना मोठ्या आवाजाच्या बंदुकांसह विशेष तंबू देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी सादर करावा. त्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी दिली जाईल, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचेही आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी सांगितले.