ही घटना काल (दि.१४) रोजी रात्री घडली.
शेतकरी जनार्धन राजाराम यादव यांच्या घरासमोरील गोठ्यात बिबट्याची मादीने हल्ला केला. यावेळी मादी समवेत तीचे पिल्लू देखील असल्याचे पायाच्या ठस्यांवरून लक्षात येते आहे. घटनेची माहिती मिळताच वनरक्षक सचिन पुरी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
यवत स्टेशन परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा मादीचा तिच्या पिल्ला समवेत संचार आढळून आला आहे.
मागील काही दिवसात स्टेशन परिसरात बिबट्याने पाळीव प्राण्यांवर तीन वेळा हल्ला केल्याच्या घटना घडल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांचे पाळीव जनावरांचे गोठे उघड्यावर असल्याने शेतकऱ्यांना जागून रात्र काढावी लागत आहे.
बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेता वनविभागाने तत्काळ उपाययोजना करून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.पूर्वी सातत्याने पारगाव व परिसरात आढळणारा बिबट्या आता यवत स्टेशन परिसरात दिसत आहे.
--
चौकट
बिबट्या पकडण्यासाठी पिंजरे लावण्याची परवानगी सध्या वन खात्याला नाही. वरिष्ठ स्तरावरून यावर बंदी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.उघडयावर असलेल्या गोठयांना तारेचे कुंपण लावून पाळीव प्राण्यांचे जीव वाचविता येऊ शकतात. कालच्या घटनेत एका मृत शेळीचा पंचनामा केला आहे तर दुसरी शेळी उसात ओढून नेली ती अद्याप मिळालेली नाही. शासकीय नियमानुसार शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळू शकेल मात्र शेतकऱ्यांनी सावध राहण्याचे आवाहन वनरक्षक सचिन पुरी यांनी केले आहे.