लोकमत न्यूज नेटवर्क
आळेफाटा : परिसरातील मुकाईमळा रस्त्याने शनिवारी (दि.११) रात्री ११च्या सुमारास घरी जाताना गणेश गडगे यांना बिबट्या दिसला. त्यांनी त्यांच्या मोबाइल कॅमऱ्यामध्ये बिबट्याच्या हालचाली टिपल्या.
जुन्नर तालुक्याचे पूर्व भागात भोवताली ऊस व पाणी असल्याने बिबट्याला निवारा चांगला मिळत असल्याने, अलीकडच्या काळात त्याचा संचार वाढला आहे. बिबट्याचे पाळीव प्राण्यांवर हल्ले होत आहे. त्याचे दर्शनही नागरिकांना होत आहे. राजुरी येथे बिबट्याचे हल्यात बालक जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. परिसरात बिबट्यांचा संचार आहे, तर शनिवारी रात्री आळेफाटा वडगाव आनंद परिसरातून आपल्या घरी मुकाईमळा येथे कारमधून गणेश नारायण गडगे जात असताना, त्यांना रस्त्यालगत बिबट्या सशाचा पाठलाग करताना दिसला. कारच्या लाइटच्या प्रकाशाने बिबट्या तेथेच थबकला व पुन्हा रस्त्याने हळूहळू चालावयास लागला. दरम्यान, गडगे यांनी समयसूचकता दाखवत, बिबट्याच्या या हालचाली मोबाइल कॅमऱ्यामध्ये कैद केल्या. बिबट्याच्या हालचालीची क्लिप आळेफाटा व परिसरात पसरल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
फोटो : गडगे यांनी मोबाइलमध्ये टिपलेला बिबट्या.