बारामती: कोरहाळे बुद्रुक (ता. बारामती) परिसरात गेल्या दोन दिवसांत बिबट्याचा वावर आढळल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. परिसरातील १३ फाटा धापटे वस्तीवर रविवारी (दि. २१) सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास चारचाकीत कुटुंबासमवेत जाणाऱ्या युवकाला बिबट्या दिसला. दरम्यान, या घटनेनंतर वन खात्याच्या पथकाने तातडीने परीसराला भेट दिली. तसेच बिबट्या आढळलेल्या ठिकाणाची पाहणी केली. परिसरात आढळलेल्या बिबट्याच्या ठशाची देखील पाहणी केली. दरम्यान, बिबट्याच्या भीतीमुळे परिसरातील वस्तीवरील ग्रामस्थांनी रात्र जागून काढली.
विनोद ज्ञानदेव खोमणे हा युवक रविवारी सायंकाळी चारचाकी वाहनात कुटुंबासमवेत निघाला होता. यावेळी समोरच दोन्ही बाजुंनी उसाचे क्षेत्र असलेल्या ठिकाणी बिबट्या दिसून आला. बिबटया निघून गेल्यानंतर या कुटुंबाने गाडीपुढे नेली. त्यानंतर प्रसंगावधान राखत परिसरातील ग्रामस्थांना ही माहिती दिली. वनरक्षक दादा जाधव यांच्याशी ग्रामस्थांनी संपर्क साधल्यानंतर ते तत्काळ या ठिकाणी पोहचले.
वनपरीक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, कोरहोळे परिसरातील त्या वस्तीवरील आढळलेले ठसे बिबट्याचेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, ग्रामस्थांनी घाबरुन जाऊ नये. वनविभागाच्या वतीने ‘ट्रॅप कॅमेरा’ लावण्यात येणार आहे. तातडीने वन विभागाचे पथक रात्रीची गस्त सुरू करणार आहे. बिबट्यापासून सुरक्षित राहण्यासाठी जनजागृतीची करण्यात येणार आहे. त्यासाठी सोशल मीडियाची देखील मदत घेतल्याचे लोणकर म्हणाल्या.