गेल्या काही दिवसांपासून चिंचोलीमध्ये बिबट्याने शेळया, कुत्री फस्त केली आहेत. तसेच शेतकऱ्यांना अनेक वेळा या बिबट्या रस्त्याने आडवा गेला होता. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. बिबट्याच्या भितीमुळे लोक शेतात कामे करायला तयार नव्हते. तर रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर निघत नव्हते. वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करत होते.
त्याप्रमाणे चिंचोली कोकण्यांची ते कोंबडवाडी रस्त्यालगत रामदास घोलप यांच्या उसाच्या शेताच्या कडेला पिंजरा लावला होता. त्यात शिकार करण्यासाठी कोंबड्या ठेवण्यात आल्या होत्या. शुक्रवारी पहाटे त्या फस्त करण्याच्या उद्देशाने बिबटया पिंजऱ्याजवळ आला अन त्यात तो अडकला. याची माहिती सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांना समजली. त्यांनी ही माहिती घोडेगाव येथील वनविभागाला कळवली. वनपरिमंडल अधिकारी वनपाल तानाजी कदम, वनरक्षक संपत तांदळे, एस. एस. भुतेकर व वनकर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन पिंजऱ्यासह बिबट्याला जुन्नर तालुक्यातील बिबट्या निवारण केंद्र माणिकडोह येथे सोडले.
फोटो : चिंचोली कोकण्यांची (ता. आंबेगाव) येथे रामदास घोलप यांच्या ऊसाच्या शेतात पिंज-यात अडकलेला बिबटया