उंडवडी: सद्यस्थितीत मानवी वस्त्यांमध्ये बिबट्यांचा वावर वाढू लागला आहे. ग्रामीण भागांबरोबरच शहर आणि उपनगरातही बिबटे दिसू लागले आहेत. वनविभागाचे अधिकारी शर्थीच्या प्रयत्नाने त्यांना जेरबंद करण्यात यशस्वी होत आहेत. नागरिकात त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
असेच दौंड तालुक्यातील सौंदडवाडी परिसरात ग्रामस्थांना बिबट्याचे राजरोसपणे दर्शन होत आहे. बिबट्या ग्रामस्थांच्या अंगावर धावून येण्याच्या तसेच काही कुत्र्यांना मारण्याच्या घटना परिसरात घडत असून त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
उंडवडी परिसरात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याचा वावर दिसत आहे. दोन दिवसांंपूर्वी सौंदडवाडी येथील हरपळे- ढोरे फार्म येथे दोन कुत्र्यांवर हल्ला करत फडशा पाडला. त्यानंतर पुन्हा सौंदडवाडी येथे बिबट्या दिसल्यानंतर शेतकऱ्यांनी त्यांनी लगेच गावच्या सरपंच दिपमाला जाधव यांना माहिती दिली. त्यांनी वनविभागाचे अधिकारी नानासाहेब चव्हाण यांच्यासमवेत घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पावलांच्या ठशांवरुन बिबट्या दीड ते दोन वर्षाचा असावा असा अंदाज व्यक्त केला असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.