लोणी काळभोर : आळंदी म्हातोबाची ग्रामपंचायत हद्दीतील रामोशीवाडी येथील डोंगरावर बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक अडीच ते तीन वर्षांचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला.बिबट्याच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामोशीवाडी येथील राहुल काळे हा तरुण ऐतिहासिक मल्हारगडाच्या पायथ्याला असलेल्या मालदरा परिसरात बैल चारण्यासाठी घेऊन गेलेले असताना त्याला शिवाजी गोविंद वाल्हेकर यांचे क्षेत्रातील झुडुपात अचानक बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्याने तो घाबरला व दोन किलोमीटर पळत परत गावाकडे आला. ही बाब त्याने आपला मित्र पारस वाल्हेकर यांस सांगितली. त्यानंतर ८ ते १० जणांसह परत त्या परिसरात गेले. त्यांनी घाबरून लांबुनच त्या प्राण्याला छोटे दगडाचे खडे मारले. परंतू काहीच हालचाल होत नाही हे पाहून ते सर्वजण भितभित जवळ गेले. त्यावेळी त्यांना सदर प्राणी हा बिबट्या असल्याचे लक्षात आले. हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांनी तत्काळ वनखात्याशी संपर्क साधला व घटना कळवली. वनखात्याचे उपवनसंरक्षक अधिकारी श्रीलक्ष्मी, सहाय्यक वनसंरक्षक मधुकर तेलंग, वनपाल वाय. यू. जाधव, एस.एस.सपकाळ, आर. बी. रासकर, बी. एस. वायकर, जागृती सातारकर, वनमजूर नाना भोंडवे हे सदर ठिकाणी पोहोचले. त्यांनी पाहणी करून माहिती घेतली. शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एच.डी. शिंदे व पी. एल. गाडे यांनी तपासणी केल्यानंतर सदर बिबट्या हा नर जातीचा असून पूर्ण वाढ झालेला आहे. याची लांबी २ मीटर असल्याचे तसेच याचा मृत्यू सुमारे १० ते १२ तासांपूर्वी झाला असल्याचे सांगितले. त्याचे अंगावर बाहेरील बाजूस कसल्याही जखमा आढळून आल्या नाहीत. परंतू याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणांमुळे झाला हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर समजणार आहे असे सांगितले. त्यानंतर सदर बिबट्याचे शवविच्छेदन करण्यासाठी त्याचा मृतदेह औध पुणे येथील पशुचिकित्सालयांत पाठवण्यांत आला आहे.बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे,अशी माहिती मिळताच पंचक्रोशीतील अबालवृद्ध त्याला पाहण्यासाठी येत होते. काही तरूणांनी तर त्याच्याबरोबर फोटो काढून सोशल मीडियावर पोष्ट करून वाहवा मिळवली.
लोणी काळभोर परिसरात मृतावस्थेत बिबट्या आढळला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 6:10 PM
आळंदी म्हातोबाची ग्रामपंचायत हद्दीतील रामोशीवाडी येथील डोंगरावर बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक अडीच ते तीन वर्षांचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला.
ठळक मुद्देबिबट्याच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट